धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या अपुऱ्या कामांमुळे नुकसान

वसई: मागील दोन दिवसांपासून आलेल्या समुद्राच्या मोठय़ा भरतीमुळे विरार अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यालगतच्या घरांना लाटांचे तडाखे बसून घरांचे नुकसान झाले आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या कामामुळे याचा फटका येथील घरांना बसला असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात अर्नाळा किल्ला परिसरातील गावाला समुद्राच्या उधाणाच्या लाटांच्या तडाखा बसून किनाऱ्यावरील घरांची पडझड होत असते. मागील तीन ते चार वर्षांत नैसर्गिक वादळामुळे २९ घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातील काहींना अजूनही शासनाची मदतही मिळाली नाही. या येणाऱ्या लाटांपासून किनाऱ्यावरील भागाचे रक्षण व्हावे यासाठी सन २०१७-१८

१०० मीटरचा लाटरोधक बंधारा मंजूर झाला. त्यानंतर शंभर मीटरची भिंतही तयार झाली. परंतु त्या भिंतीच्या पुढे ७.५० रुंद व ४ फूट उंच अशी मोठय़ा दगडाची रांग भिंतीच्या संरक्षणासाठी जे दगड टाकायचे होते ते टाकले नाहीत. सध्या त्याच भिंतीच्या पुढे ३५० मीटरचा बंधारा मंजूर झाला असून त्याचे केवळ १५ मीटर इतकेच काम झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून येथील कामही ठप्प झाले असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे. जर येथील बंधारे पूर्ण झाले तर घरांचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते, परंतु कामच अपूर्ण राहिल्याने अजूनही घरांना तडाखे बसत आहेत.

अर्नाळा किल्ल्यात साडेचार हजार लोकांचे गाव असून २८ व २९ एप्रिल रोजी उत्तर पूर्व येथे आलेल्या उधाणाच्या समुद्राच्या लाटांनी गावात मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले. या लाटांच्या तडाख्यात किनाऱ्यावरील वासंती म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, सचिन मेहेर, राकेश म्हात्रे या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी तहसीलदार उज्वला भगत यांना सदर घटनेबाबत कळवून नागरकांच्या घरांचे पंचनामे करावे अशी मागणी केली आहे. तसेच पतन विभागाने ही  बंधाऱ्यांचे काम पावसाळ्यापूर्वी करावी अशी मागणी सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी केली आहे.

अर्नाळा किल्ला येथे लाटांमुळे झालेल्या नुकसानाची माहिती मिळाली आहे. यासाठी नुकसानग्रस्त भागांची पहाणी व पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

– उज्वला भगत, तहसीलदार, वसई

 

अर्नाळा किल्ला येथील बंधाऱ्यांचे काम सुरू केले होते. मात्र त्या ठिकाणी झालेल्या वादविवाद यामुळे ते काम बंद झाले. ते काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन हे काम सुरू केले जाणार आहे.

कल्पेश सावंत, उपकार्यकारी अभियंता पतन विभाग