रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. विनयभंग, छेडछाड, लंगिक अत्याचाराची तब्बल २२२ प्रकरणे गेल्या पाच वर्षांत समोर आली आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रायगड पोलिसांकडून दामिनी पथक कार्यान्वयित केले जाणार आहे.
गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुलींसदर्भात तब्बल २२२ वेगवेगळे गुन्हे समोर आले आहेत. यात बलात्कार अपहरण आणि विनयभंग केल्याच्या प्रकरणांचे प्रमाण अधिक आहे. रायगड पोलिसांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची ५९ प्रकरणे समोर आली आहेत. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग केल्याप्रकरणी तब्बल 83 गुन्हे दाखल झाले आहेत. मनात लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी २५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. प्रौढ महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे.
अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व्यापक पावले उचलण्याचा निर्णय आता रायगड पोलिसांनी घेतला आहे. महिलांना अन्यायाविरोधात उभे राहण्याची उमेद मिळावी यासाठी एकीकडे प्रबोधन केले जाणार आहे. ८ वी ते १० वीत शिकणाऱ्या शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींसाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. या कार्यशाळांमधून मुलींना त्यांचे हक्क, महिलांकरिता असलेले कायदे, स्वरक्षणासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वयित केले जाणार आहे. या पथकांमध्ये प्रत्येकी दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असणार असून, हे पथक मोटर सायकलवर तनात असणार आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी ही पथके गस्त घालणार आहेत. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले जातील, या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटना स्थळी दाखल होऊ शकेल. रायगड जिल्ह्यातील महिला दक्षता समिती सदस्यांसाठी लवकरच एक वॉट्सअ‍ॅप ग्रुप कार्यान्वयित केला जाणार आहे. महिलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. या मदतीने रायगड जिल्हा महिला व दक्षता समितीची बठक नुकतीच अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. पोलीस उपअधीक्षक राजेंद्र दंडाळे आणि महिला पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस कटिाबद्ध असून विविध उपाययोजना करत आहेत. महिला दक्षता विभागातील सदस्यांनी यात सहकार्य करून पोलिसांचे हात बळकट करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक हक यांनी केले.

‘दामिनी पथक हे दोन महिला कर्मचाऱ्यांचे सुसज्ज मोबाइल पथक असेल. या पथकाकडे मोबाइल, वॉकी टॉकी आणि अत्याधुनिक शस्त्रेही तनात असतील. स्थानिक नगर परिषदा या पथकांसाठी मोटर सायकल उपलब्ध करून देतील. यानंतर हे पथक महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास तनात असेल. ’
– अरिवद पाटील, जनसंपर्क अधिकारी,
रायगड पोलीस