यंदाच्या हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील धरणे आणि बंधाऱ्यांमध्ये असलेल्या पाणीसाठय़ामध्ये घट झाली असून चिंताजनक स्थिती बनली आहे.रत्नागिरी जिल्ह्य़ात तीन मध्यम आणि २४ लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. याव्यतिरिक्त अनेक गावे आणि वाडय़ांच्या ठिकाणी स्थानिक पातळीवर बांध घालून पाणी अडवण्यात आले आहे.
गावांच्या व वाडय़ांच्या नळपाणी योजनेसाठी खोदलेल्या विहिरींचे पुनर्भरण होण्यासाठी ते उपयोगी पडतात. पण यंदा जून महिना संपत आला तरी या महिन्याच्या सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नसल्यामुळे या सर्व ठिकाणी असलेले पाणीसाठे आटत चालले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका जाणवू लागला आहे.
जिल्ह्य़ात रत्नागिरीसह राजापूर, लांजा, चिपळूण, खेड व दापोली या शहरांना नजीकच्या धरण किंवा बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणीही पाणीसाठय़ाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास हे साठे आणखी आटण्याचा संभव आहे. अशा स्थितीत मोठय़ा शहरांप्रमाणे या नगर परिषदा- नगर पंचायतींच्या हद्दीतही पाणीकपातीचे धोरण अवलंबावे लागेल, अशी चिन्हे आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाने एवढा ताण देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:04 pm