भाजप प्रदेशाध्यक्षपद
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या खासदार रावसाहेब दानवे यांच्या नावाच्या चर्चेला गुरुवारी बळ मिळाले. भाजपचे माजी राष्ट्रीय नितीन गडकरी यांनी गुरुवारी दानवे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. त्यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे दानवे यांनी पूर्वीच जाहीर केले होते. गेल्या काही दिवसात या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचे दानवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पंचायत समिती सभापती, दोन वेळा आमदार व नंतर सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दानवे प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य व प्रबळ दावेवार असल्याची चर्चा मराठवाडय़ात आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनीही दानवे यांची भेट घेतली. तसेच प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत ज्यांचे नाव काही दिवस चर्चेत होते, ते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही सकारात्मक चर्चा केल्याचा दावा दानवे यांनी केला.
दोन वेळा आमदार व तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या दानवे यांच्या गाठिशी मोठा राजकीय अनुभव आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर येथे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गुरुवारी मराठवाडय़ात दाखल झालेल्या गडकरी यांनी ऐनवेळी दानवे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने प्रदेशाध्यक्ष पदासाठी दानवे यांच्या नावाला पाठबळ  मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. दानवे स्वत: देखील सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत असल्याने त्यांच्या नावावर एकमत होईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपमध्ये एकनिष्ठेने काम करणाऱ्या दानवे यांना आतापर्यंत संघटनात्मक पातळीवर मोठे पद दिले गेले नव्हते. अध्यक्ष पदासाठी दोन गट सरळसरळ निर्माण झाले असल्याचे चित्र भाजपमध्ये चर्चेत होते. गोपीनाथ मुंडे आणि गडकरी या दोघांनीही दानवे यांची भेट घेतल्याने ते सर्वमान्य उमेदवार ठरतील, असे चित्र दिसून येत आहे.