सुप्रीम कोर्टाने राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला असतानाच आता या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. डान्सबारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, फौजिया खान आदी मंडळींनी शनिवारी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. डान्सबारच्या निर्णयासंदर्भात महाराष्ट्र सरकार न्यायालयात भक्कम बाजु मांडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तर फौजिया खान यांनी मुख्यमंत्र्यांना घुंगरु पाठवणार असल्याचे सांगितले.

आबांनी डान्सबार बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. परंतु या डान्सबार बंदीबाबत सरकारला न्यायालयात भक्कम बाजु मांडता आली नाही. त्यामुळे न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली असे फौजिया खान यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यात महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे. डान्सबारच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांना घुंगरु पाठवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले. सरकारने मराठा आरक्षण दिले परंतु ते आरक्षण न्यायालयात टिकेल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी तज्ज्ञ वकीलांची टीम द्यावी आणि सरकारने विशेष लक्ष घालावे असे अजित पवारांनी सांगितले. शेतकरी समाज आज अडचणीत आला आहे,बेरोजगारी वाढलेली आहे . ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोपही त्यांनी केला. आम्ही लोकांनी सुद्धा अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळला आहे. त्यातले बारकावे आम्हाला माहित आहेत आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात कॅबिनेट घेवून जाहीर केले की विविध समाजासाठी ७०० कोटी देवू परंतु ते पैसे अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्याशिवाय मंजूर कसे होईल. हा एक चुनावी जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली.

लोकसभेबाबत आम्ही काँग्रेसबरोबर चर्चा करत आहोत. ४४ जागासंदर्भात आमचा निर्णय जवळपास झालेला आहे बाकी ४ जागांचा विचार चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.