लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ात माढय़ातून राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडून आले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादीच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे. केवळ माळशिरस व माढा या दोनच विधानसभा मतदारसंघातून मोहिते-पाटील यांना मतांची आघाडी घेता आली. करमाळ्यासह जिल्ह्य़ातील उर्वरित राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये सपशेल निराशा पत्करावी लागल्यामुळे पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात येत्या शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत काय चर्चा होणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार मोहिते-पाटील यांना केवळ स्वत:च्या माळशिरस भागाने ३९ हजार मतांची भरघोस आघाडी दिल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते-पाटील यांना १४ हजार २२५ मतांची आघाडी मिळाली असली तरी यात पक्षाचे स्थानिक आमदार बबनराव शिंदे यांच्या टापूतून मोहिते-पाटील यांना अपेक्षित साथ मिळाली नाही, तर माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग आदी १४ गावांतून मिळालेले मताधिक्य निर्णायक ठरले. त्यामुळे माढय़ातील मताधिक्य म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांचे कर्तृत्व शून्य  असल्याचे दिसून येते. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करताना आमदार बबनराव शिंदे यांच्यासाठीसुध्दा ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. आमदार शिंदे हे कालपर्यंत मोहिते-पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जायचे.
करमाळा येथे राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल व काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप हे दोन्ही नेते एकत्र येऊनदेखील त्यांची मदत मोहिते-पाटील यांना होऊ शकली नाही. याठिकाणी मोहिते-पाटील यांना १४ हजार ८२३ मतांची पिछाडी पत्करावी लागली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरशी दिसून आली. तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राष्ट्रवादीला समर्थन दिले तरी प्रत्यक्षात तेथेही मोहिते-पाटील यांची १४ हजार ४७६ मतांची पिछाडी झाली. राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे हे याच सांगोला तालुक्याचे आहेत. त्यामुळे आमदार साळुंखे यांना मोहिते-पाटील यांच्या विजयाचा गुलाल खेळण्याचा अधिकार गमवावा लागला. फलटण येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर हे कमी पडले असून तेथून मोहिते-पाटील यांच्यापेक्षा प्रतिस्पर्धी सदाशिव खोत यांना ६०६ मते जादा मिळाली. त्यामुळे फलटण भागातही राष्ट्रवादीतील चिंता वाढली आहे.
इकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या धक्कादायक पराभवाचे वाटेकरी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सोलापुरात मोहोळ या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर शिंदे यांची भिस्त होती. मागील २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे एक लाख मताधिक्याने निवडून येताना सुशीलकुमार शिंदे यांना याच मोहोळ भागातून राष्ट्रवादीने सर्वाधिक ३५ हजार ७१० एवढे मोठे मताधिक्य दिले होते. पंढरपूर-मंगळवेढा भाग राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला. या भागातून मागील निवडणुकीत शिंदे यांनी ३४ हजार १८८ मतांची आघाडी घेतली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिंदे यांची मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही भागांतून पार निराशा झाली. १३ हजार ४४२ मतांची मोहोळमधून तर पंढरपूर-मंगळवेढय़ातून तब्बल २१ हजार मतांची पिछाडी शिंदे यांना सहन करावी लागली. त्यामुळे या दोन्ही भागात राष्ट्रवादीसमोर हा चिंतेचा विषय ठरला आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील बार्शी विधानसभा मतदारसंघ शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असताना बार्शीतून लोकप्रतिनिधित्व करणारे सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना निवडून आणण्याचा विडा उचलला होता. परंतु त्यांच्या बार्शीतच राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. तब्बल ४४ हजारांचे मताधिक्य डॉ. पाटील यांना पराभूत करणारे शिवसेनेचे रवी गायकवाड यांना बार्शीतून मिळाले. ही परिस्थिती पाहता बार्शीत आगामी विधासभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव रोखला जाऊ शकत नाही, असे राजकीय जाणकार सांगतात.