22 September 2020

News Flash

पावसाचा जोर कमी झाल्याने सांगलीचा पुराचा धोका टळला

चांदोलीतील विसर्ग वाढला

सांगलीतील आयर्वनि पुलाजवळ एनडीआरएफच्या पथकाने सराव केला.

पावसाचा जोर कमी झाल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका तूर्त टळला असला, तरी चांदोली धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने आणि पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने कृष्णा नदी पात्रातील पाणीपातळी धिम्या गतीने कमी होत आहे. दिवसभरात केवळ ९ इंचाने पाणी पातळी कमी झाली असून चांदोली धरणातील पाणीसाठा ८५ टक्के झाला आहे.

धरणाच्या आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर रात्रीपासून कमी झाला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत चांदोली धरणाजवळ ८८ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र धरणातील पाण्याची आवक सातत्याने होत असल्याने आणि धरणातील पाणीसाठा २९.२५ टीमएसी झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारपासून सांडव्याद्वारे ५ हजार १०० आणि पायथा विद्युतगृहाद्वारे १ हजार ४०० असा साडेसहा हजार क्युसेक्स प्रति सेकंद विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी आणखी वाढणार आहे.

दरम्यान, कोयना धरणामध्ये ८० टीएमसी पाणीसाठा झाल्याविना विसर्ग करण्यात येणार नसल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. सध्या कोयनेमध्ये ७०.३०० टीएमसी पाणीसाठा झाला असून नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचा जोर मंदावल्याने नदीतील पाणी पातळी कमी होत आहे. शुक्रवारी सकाळी आयर्वनि पुलाजवळ कृष्णेची पाणी पातळी २३ फूट ९ इंच होती, ती सायंकाळी २३ फुटांपर्यंत उतरली. धोका पातळी ४५ फूट आहे.

तथापि, वारणेतील विसर्ग, सुरू असलेला पाऊस आणि राधानगरी धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी धिम्या गतीने कमी होत आहे. वारणेचे पाणी हरिपूर येथे तर पंचगंगेचे पाणी नृसिंहवाडी येथे कृष्णेला मिळत असल्याने पाण्याचा उतार धिम्या गतीने असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी महापालिकेने टिळक चौक येथे आपत्ती निवारण कक्ष शुक्रवारी सुरू केला. या ठिकाणी अग्निशमन विभागाचे सहा जवान, एक यांत्रिक बोट २४ तासांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

’ गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस शिराळा येथे ४५.५ मिलीमीटर नोंदला गेला. पावसाची जिल्ह्य़ातील सरासरी ८.९१ मिलीमीटर असून अन्य तालुक्याच्या ठिकाणी झालेला पाऊस असा- इस्लामपूर ९.५, मिरज ६.५, तासगाव ३.४, कवठेमहांकाळ २.३, कडेगाव ७.६, खानापूर ४, पलूस १ आणि जत २.४ मिलीमीटर नोंदला गेला. आटपाडी तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:08 am

Web Title: danger of floods in sangli was averted as the intensity of rains decreased abn 97
Next Stories
1 गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे धावणार
2 चंदगड तालुक्यात दोरखंडाचा वापर करून बचावकार्य, सुसज्ज यंत्रणेच्या दाव्यातील फोलपणा
3 कोल्हापूर: पावसाने घेतली उसंत,धरणातील विसर्गामुळे महापुराचा धोका
Just Now!
X