इमारत एका बाजुला झुकली; १८ सदनिकाधारकांचा जीव मुठीत

डहाणू : डहाणू नगर परिषद हद्दीतील डहाणूरोड पूर्वेकडील शंकरशिला निवासी संकुलातील एक इमारत दुसऱ्या इमारतीला  तिरकस टेकली गेली असल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.  याबाबत डहाणू नगर परिषदेने शंकरशिला सहकारी संस्थेला संरचनात्मक निरीक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असतानाही संस्था टाळाटाळ करीत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. इमारतीतील १८ रहिवाशी भीतीच्या छायेत आहेत.

डहाणू पूर्वेस रामटेकडीजवळील शंकरशिला संकुलाच्या अ इमारतीमध्ये १८ आणि ‘इ’ इमारतीत १८ असे ३६  रहिवासी राहत आहेत. ‘अ’  इमारतीचा भार दिवसेंदिवस एकाच दिशेने झुकला जाऊ लागल्याने रहिवाशी जीव मुठीत धरुन राहत आहेत. तर ‘अ’   इमारत  लगतच्या  इ   इमारतीला तिरकस जोडली गेली आहे. डहाणूत ३.५ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झालेली आहे.

भूकंपाच्या वारंवारच्या हादऱ्यामुळे डहाणूतील रहिवासी भीतीच्या छायेत जगत आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामध्ये इमारत कोसळण्याची दाट शक्यता असून जीवित व वित्तहानी होण्याची भीती असल्याचे रहिवासी जगदीश चव्हाण यांनी नगर परिषद प्रशासनाला कळवले आहे. ३० जून २०२० रोजी नगर परिषद प्रशासन रचना साहाय्यक यांनी पाहणी अहवाल सादर करून इमारत धोकादायक असल्याचा अहवाल नगर परिषदेला सादर केला आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी  नगर परिषदेने शंकरशिला संकुलाला शासकीय अभियंता यांच्याकडून इमारत  स्थिरतेबाबत संरचनात्मक अहवाल सादर करण्याच्या नोटीस बजावली आहे.

अहवाल सादर करण्यास संस्था टाळाटाळ करीत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर निकृष्ट बांधकामास जबाबदार असलेले विकासक व त्यांच्याशी संबंधित आणि आर्किटेक्ट यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

डहाणू पूर्वेकडील शंकरशिला एव्हेन्यू को-ऑ. सोसायटीने डहाणू नगर परिषदेला संरचनात्मक अहवाल केल्याचे कळवले आहे. परंतु अद्याप अहवाल नगर परिषदेला सादर केलेला नाही. – गोपाल काळे, नियोजन प्राधिकारी, डहाणू नगर परिषद