प्राण्यांची शिकार, मौल्यवान लाकडांसाठी आगी लावण्याचे प्रकार सुरूच

लोकसत्ता वार्ताहर

वाडा :    तालुक्यात  ऐतिहासिक  कोहोज  किल्लय़ाच्या परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रावर वनसंपत्ती आहे. परंतु काही समाजकंटकांकडून जंगली प्राण्यांची शिकार तसेच मौल्यवान लाकडे चोरण्यासाठी येथे आगी लावण्याचे प्रकार करीत आहेत. बुधवारीही ही आग लावण्याचा प्रकार घडला आहे.  त्यामुळे ही वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

वाडा तालुक्यात एकुण २४ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात विविध ठिकाणी दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर नव्याने वृक्षारोपण करण्यात येते.   शासनाने हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करुन या ठिकाणी लाखो रुपये खर्च केले आहेत. येथील जंगल संपत्तीचे रक्षण करण्यासाठी या किल्ला परिसरापासुन अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कंचाड वनपरिक्षेत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. येथील वन अधिकाऱ्यांची व वन कर्मचाऱ्यांची नेहमीच येथे गस्त सुरू असते. तरीसुद्धा रात्री अंधाराचा फायदा घेऊन प्राण्यांची शिकार करण्यासाठी येथील शिकारी कोहोज किल्ला परिसरात वनवे लावत असतात.

येथील जंगल परिसरात गस्त घालण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही तसा प्रकार आढळून आल्यास वनविभागाला माहिती द्यावी.

जे.आर. तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कंचाड वनपरिक्षेत्र, ता. वाडा.