‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ अशी शिकवण दिली. परंतु आपली कृती त्याउलट आहे. आपण एखाद्या प्रकारावरुन संघर्षांला उठतो, शक्य झाले तर संघटित होतो आणि त्यापेक्षाही दूरची गोष्ट म्हणजे शिक्षणाची. अशा परिस्थितीत आपण आंबेडकरी अनुयायी कसे हे सिद्ध करण्यासाठी भांडणाला उठतो. आंबेडकरांचे म्हणवणारे आम्हीच, आंबेडकरी विचार मारतो की काय,’’ अशी भीती सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. अस्मितादर्श साहित्य संमेलनात ते बोलत होते.  कुसुम सभागृहातल्या हरिहरराव सोनुले नगरीत सुरू झालेल्या या संमेलनात व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, खा. अशोक चव्हाण, आ. अमर राजूरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, डॉ. कृष्णा किरवले, वासुदेव मुलाटे, दादा गोरे, प्रफुल्ल सावंत यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले,की भारतीय माणसे जगाच्या कानाकोपऱ्यात गेली. परंतु गावगाडय़ांचे सांगाडे न्यायला विसरले नाहीत. जाती वाटण्यासाठी माणसे कमी पडली म्हणून आम्ही प्राण्यांनाही जाती लावल्या. गाय अमूक जातीची तर डुक्कर तमूक जातीचे, हे कुठपर्यंत चालणार आहे आणि ते कसे चालू देणार? असा सवाल त्यांनी केला. एक प्रकारचा फॅ सिझम पसरला आहे. तो धोकादायक आहे हे तुम्हाला का वाटत नाही, असा सवाल त्यांनी केला.
डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाचे पुतळे नव्हे, तर त्यांचे विचार हृदयात घेऊन जगता आले तरच त्या जगण्याला अर्थ आहे. व्यवस्थेशी संघर्ष केलाच पाहिजे. परंतु माणूस नाकारणे हे कोणत्याही तत्त्वज्ञानात बसत नाही. एकमेकांवर प्रेम करू, व्यवस्था नाकारू, परंतु माणूस स्वीकारू याच दृष्टीने सगळ्यांची पाऊले पाहिजेत, असेही नागराज मंजुळे म्हणाले.
या वेळी बोलतना संमेलनाचे उद्घाटक खा. अशोक चव्हाण म्हणाले की, दुष्काळाने हवालदिल झालेले शेतकरी मोठय़ा संख्येने मृत्यूला कवटाळत आहेत. ही बाब मनाला वेदना देणारी असून अशा प्रकारच्या साहित्य संमेलनातून साहित्यिकांनी हतबल शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, तसेच भेडसावणाऱ्या या समस्येबाबत ऊहापोह व्हायला हवा.
 सध्या देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मातर, पक्षांतर यावरून प्रचंड गहजब आहे. संभ्रमाच्या अशा वातावरणात देशाच्या कानाकोपऱ्यात विविध साहित्य संमेलने सुरू आहेत. त्यातून प्रबोधन होते की गोंधळ हा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलने आणि वादविवाद हे जणू काही समीकरणच ठरले आहे. परंतु अस्मितादर्श त्याला अपवाद ठरली, ही बाब समाधानकारक आहे. साहित्य संमेलन किंवा साहित्यिकांकडून वैचारिक प्रबोधनाची अपेक्षा आहे. अशा मंचावरून विचारमंथन व्हावे, त्यातून लोकांपर्यंत चांगले विचार जावेत. समाजाला एकप्रकारची दिशा मिळावी. एखादी विचारसरणी जबरदस्तीने आपले विचार लादण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबाबत आवाज उठवण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. जनमताच्या कौलाचा दुरुपयोग तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला.
या वेळी अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. या संमेलनाला मोठी गर्दी होती.