रमेश पाटील

वाडा व विक्रमगड या दोन्ही तालुक्यांत असलेल्या नद्या, नाले आणि ओढय़ांवर महत्त्वाच्या ठिकाणी अजून पूल झालेले नसल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना तराफ्याच्या साहाय्याने शाळा, महाविद्यालय आणि घर गाठावे लागत आहे.

विक्रमगड तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारा म्हसापाडय़ाला पावसाळ्यातील चार महिने बेटाचे स्वरूप येते. या पाडय़ाला पिंजाळी व गारगाई या दोन नद्यांनी वेढा दिल्याने या पाडय़ाचा विक्रमगड व वाडा या दोन्ही तालुक्यांशी पावसाळ्यात संपर्क तुटतो. म्हसापाडा येथे ३० कुटुंबे राहत असून १४७ लोकसंख्या आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेची चौथी इयत्तेपर्यंत शाळा असून  विद्यार्थी पटसंख्या २१  आहे. ज्या विद्यार्थ्यांना निवास सुविधा मिळत नाही ते मलवाडा येथे शाळेत जाण्यासाठी पिंजाळी नदीचे पात्र तराफ्याच्या साहाय्याने पार करून जावे लागते. म्हसापाडय़ाशेजारी  कोसुमुडा नावाचा पाडा असून या पाडय़ात ४० कुटुंबे राहत असून लोकसंख्या १५० आहे. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात या दोन्ही पाडय़ांचा संपर्क तुटतो. या दोन्ही पाडय़ांत पावसाळ्यात कुठलेही वाहन (दुचाकीसुद्धा नाही) जाऊ  शकत नसल्याने कोणी आजारी पडले तर डोली करून जंगलातील वाट तुडवत सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गारगांव आरोग्य केंद्रात न्यावे लागते.  सध्या म्हसापाडा व कुसुमुडा येथील विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी तसेच ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी मलवाडा ही एकमेव जवळचे ठिकाण आहे.  जीव धोक्यात घालून तराफ्याच्या साह्य़ाने तेथे जाण्यासाठी नदी प्रवास करावा लागतो, अन्यथा जंगलातून चिखल तुडवत सात किलोमीटर अंतरावर असलेली गारगांव ही बाजारपेठ गाठावी लागते.

पुलासाठी २५ वर्षांपासून प्रयत्न

वाडा शहराजवळून वैतरणा नदी वाहत असते. या नदीच्या पलीकडे वाडा येथे येण्यासाठी  विलकोस हा पर्यायी मार्ग आहे; परंतु तो दहा ते बारा किलोमीटर जास्त अंतराचा आहे. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वर ते विलकोस या दरम्यान पूल होण्यासाठी  विलकोस, तुसे, कोयना आदी गावांतील ग्रामस्थ गेले पंचवीस वर्षे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना आजपर्यंत यश आलेले नाही.

विलकोस येथे जाण्यासाठी वैतरणा नदीवर प्रस्तावित पुलाला मंजुरी मिळाली आहे. अर्थिक तरतूद झाल्यावर कामाला सुरुवात होईल.

– प्रकाश पातकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा

म्हसापाडा येथे गारगाई नदीवर असलेल्या दगडी बंधाऱ्यावर एक मीटर रुंदीची सिमेंटची पायवाट तयार केली तरी आमची पावसाळ्यातील बिकट वाट दूर होईल.

– काशिनाथ ठाकरे, म्हसापाडा