नव्या मासेमारी हंगामाला मोठय़ा जोमाने सुरुवात झालेली असतानाच मच्छिमारांच्या मार्गात समुद्रातील दीपस्तंभावरील बत्ती गुल झाली आहे. वसईसह नायगाव, खोचिवडे, उत्तन आणि  अर्नाळा ठिकाणी मच्छीमारांना दिशादर्शक ठरणाऱ्या वसईजवळच्या समुद्रातील पोशापीर खडकावर असलेल्या दीपस्तंभावरील दिवा बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी मच्छीमारांचा प्रवास धोकादायक झाला आहे.

वसईच्या पश्चिमेला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर समुद्रात पोशापीर नावाचा प्रचंड मोठा खडक आहे. या खडकाच्या एका बाजूस विस्तीर्ण सॅण्डबार (रेतीचा पट्टा) असून दुसऱ्या  बाजूला तीन किलोमीटर लांबीची पोशापीरच्या खडकांची रांग आहे. सॅण्डबार आणि खडकांची रांग यांच्या मधून ४० ते ५० फुटांचा चिंचोळा मार्ग आहे. या मार्गातीन मच्छीमारांना त्यांच्या बोटी समुद्रात वा किनाऱ्यावर आणता येतात. हा चिंचोळा मार्ग अत्यंत धोकादायक असून या मार्गातून जाताना बोटीचे सुकाणूधारीला कमालीची सावधगिरी बाळगावी लागते.  थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी अपघात होऊन बोट खडकावर आदळण्याचा धोका असतो.पोशापीर खडकांवर आदळून वसईतील अनेक मच्छिमार बोटींना अपघात झाले आहेत.  रात्रीच्या वेळी दीपस्तंभावरील दिवा बंद असेल तर धोका जास्त असतो.पोशापीर खडकावरील दीपस्तंभातील झोत दिवे नेहमीच बंद असतात. वसई, खोचिवडे व नायगावच्या सुमारे ३०० मच्छिमार बोटी अपरात्री मासेमारी करून येताना या पोशापीर खडकापासून सुमारे दोन मैलांवर दूर नांगर टाकून रात्रभर दिवस उजाडण्याची वाट पाहतात. त्यामुळे पुन्हा लगेच मासेमारीस जाता येत नाही, हा तोटा तर होतोच, पण रात्रभर खोळंबा होऊन बोटीतील ताजी मासळी योग्य वेळी मुंबईत पोहोचत नाही. त्यामुळे मासळी खराब होऊन आर्थिक नुकसानही होते, असे रमाकांत कोळी यांनी सांगितले.

पोशापीरच्या मार्गावर आजवर अनेक बोटींना अपघात झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी पोशापीरच्या दगडांची रांग सुरूंग लावून फोडणे, हा सागरी मार्ग अधिक मोठा करणे, ठराविक अंतरावर तरंगते दिवे लावणे याबाबत अनेक वेळा विचार आणि चर्चा झाल्या आहेत. त्यानंतर काहीही झालेले नाही.

अर्नेस्ट मस्तान, स्थानिक मच्छिमार

पोशापीर खडकावरील दीपस्तंभावरील दिप बंद असल्याबाबत आमच्याकडे तRारी आलेल्या नाहीत. मात्र, याबाबत खात्री करून आम्ही कार्यवाही करू

-बी. राठोड, बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, वसई