कोपरगाव शहरासह राहाता व कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी गावे ही गोदावरी कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून असून येथे चालू हंगामात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असून, शासनाने तात्काळ दारणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली आहे.
ते म्हणाले, की कोपरगाव शहराला १० ते १२ दिवसाआड पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. मागील आवर्तनात पुरेशा प्रमाणात पाणी मिळालेले नाही. त्याचप्रमाणे गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांवरील कोपरगाव व राहाता तालुक्यातील १०० ते १२५ गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना यावर अवलबून आहे, तसेच शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धार्मिक स्थळ असून साईबाबांच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भक्त येथे येत असतात. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. पाण्यासाठी महिला रानोमाळ भटकंती करीत आहे.
दारणा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झालेली आहे. टंचाई परिस्थितीत हे पाणी  जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आहे. यासंदर्भात आपण नगर व नाशिकचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्याशी तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता जी. एस. लोखंडे, नाशिक पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सुनील बाफना, अधीक्षक अभियंता पोकळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असून निवेदनाच्या प्रतीही पाठवलेल्या आहेत.
    पिण्याच्या पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचीही परिस्थिती अवघड आहे. पशुधन कसे वाचवावे हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे. तसेच शाळा-महाविद्यालयेही सुरू झालेली असून दैनंदिन वापरासाठी मोठी अडचण भासू लागली आहे. बागायती भागातील विहिरी, िवधन विहिरी पूर्णपणे आटल्या आहे. जिरायती भागात जानेवारीपासूनच पाण्याची अडचण आहे. पिण्याच्या पाण्याचा टँकरवरील शासनाचा खर्च वाढत आहे तेव्हा या सर्व परिस्थितीचा विचार गांभीर्याने करून दारणा धरणातून ताबडतोब पिण्याचा पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे व नागरिकांना पिण्याचे पाणी तात्काळ द्यावे, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. दारणा धरणात नव्याने दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. टंचाई परिस्थितीत नाशिक-नगरच्या जिल्हाधिकारी यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्काळ निर्णय घेऊन पिण्यासाठी पाणी द्यावे.