करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग म्हणून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही दर्शनासाठी बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना विठठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा तसेच गुगल प्ले स्टोअरमधून shree vitthal rukmni live Darshan अॅप डाऊनलोड करावे. तसेच जिओ टीव्हीवरील जिओ दर्शन आणि टाटा स्कायवरील ॲक्टिव्ह चॅनेल या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहेत.

१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा करोनाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकाला दर्शनासाठी मंदिरात सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूरात येणे टाळावे. त्याऐवजी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या ऑनलाइन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांनी केले आहे.