राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांतच या पदावर पक्षाने काशिनाथ दाते (पारनेर) यांची नियुक्ती केली. दाते यांच्या नियुक्तीने पक्षाच्या अनेक ज्येष्ठांना धक्का बसला आहे. दाते यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव व पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याशी चर्चा झाल्यानंतर करण्यात आल्याचे पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. काकडे उद्या, सोमवारी दुपारी होणा-या मेळाव्यात दाते यांना नियुक्तीचे पत्र देणार आहेत.
दाते यांच्या नियुक्तीपूर्वी पक्षातील काही ज्येष्ठांकडे पद स्वीकारण्याबद्दल विचारणा झाली होती, परंतु त्यांनी नकार दिल्याचे सांगितले जाते. विधानपरिषदेवर नियुक्ती न झाल्याने शेलार काही दिवसांपासून नाराज होते, परंतु पक्षाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी पक्षातील नेत्यांना पूर्वसूचना न देता आज सकाळी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र शेलार यांच्या राजीनाम्याचा पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही, याचे संकेत देण्यासाठी लगेच दुपारी दाते यांची या पदावर नियुक्ती केल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. आपल्याला हे पद अनपेक्षितपणे मिळाले, पक्षातील सर्व गटतट, मतभेद दूर करून ज्येष्ठांच्या सहकार्याने काम करू, असे दाते यांनी‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
दाते पूर्वी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. काँग्रेसच्या फुटीनंतर १९९९ मध्येच ते राष्ट्रवादीत आले व तालुकाध्यक्ष झाले. सन २००४ च्या विधानसभेसाठी त्यांना पारनेरमधून उमेदवारी न मिळाल्याने ते पक्षापासून लांब झाले. जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य म्हणूनही ते निवडून आले होते. काही काळ त्यांनी शिवसेनेतही काम केले. नंतर पुन्हा त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये पक्षात प्रवेश केला. गेल्या आठ वर्षांपासून ते पारनेर बाजार समितीचे सभापती आहेत.
पाचपुतेंची स्पष्टोक्ती
शेलार यांची नगरला पत्रकार परिषद सुरू असताना श्रीगोंदे येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा पूर्वनियोजित मेळावा सुरू होता. शेलार यांच्या राजीनाम्याचे वृत्त येथे थडकताच मेळाव्याचा नूर एकदम बदलला. पाचपुते विधानसभेच्या दृष्टीने अपक्ष उमेदवारीची चाचपणी करीत होते, मात्र शेलार यांचा निर्णय समजताच मेळाव्यातच त्यांनी या विषयावर पडदा टाकला. आपण पक्षाकडूनच निवडणूक लढवणार, शरद पवा हेच आपले नेते आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.