राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, असे मत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज (शुक्रवार) मांडले.

राज्यात करोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.

आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की, कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे.

त्यामुळे सद्य स्थितीमध्ये परीक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात. आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सूचित केले.