News Flash

वृद्धाच्या हत्येप्रकरणी सून, नातवास पोलीस कोठडी

वैद्यकीय अहवालानंतर मयत कारभारी खामकर यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिनिधिक छायाचित्र

तालुक्यातील लोणी येथे ८० वर्षीय वृद्धाची हत्या सून व नातवाने केल्याच्या संशयावरून लोणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले असता सुनेस ५ दिवसांची तर नातवास ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सदर वृद्धाची हत्या पशासाठी झाली असल्याचा संशय लोणी पोलिसांना असल्याने मागील महिन्यात झालेल्या या खुनाचे रहस्य उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मयत कारभारी सावळेराम खामकर (वय ८०) हे १७ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची खबर लोणी पोलिसात त्यांचा नातू विक्रम खामकर याने नोंदवली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबरला कारभारी खामकर यांचा मृतदेह घरापासून सुमारे ४ किलो मीटर अंतरावर निर्जनस्थळी ऊस शेतीत बांधाच्या कडेला सापडला. त्यानंतर मृतदेहाची जागेवरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर मयत कारभारी खामकर यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणी पोलिसात १७५/१७ भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा अपघात, घातपात की हत्या या दिशेने लोणी पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र ही हत्या कोणी आणि कशाकरिता केली याचा शोध पोलिसांना घेण्याचे आवाहन होते. अनेक दिशेने तपास केल्यानंतर सदर हत्या कुटुंबातीलच कुणीतरी व्यक्तीने केली असल्याचा दाट संशय लोणी पोलिसांना होता.

मयत कारभारी खामकर यांच्या खून प्रकरणी संशयावरून त्याची सून संगीता कुशिनाथ खामकर (वय ४२, रा. लोणी) व नातू संतोष कुशिनाथ खामकर (वय २१, रा. लोणी) यांना लोणी पोलिसांनी काल ताब्यात घेतले. राहाता न्यायालयासमोर हजर केले असता सुनेस ५ तर नातवास ३ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. सदर हत्येचा तपास अवघ्या एक महिन्याच्या आत लागण्याची शक्यता या दोघांच्या अटकेनंतर निर्माण झाली आहे. हत्येप्रकरणी घरातीलच सून आणि नातू यांना अटक झाल्याने या खुनामागील रहस्य उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर वृद्धाची हत्या पशासाठी केली असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. सदर घटनेचा तपास लोणीचे स.पो.नि. रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख करीत आहेत.

हत्या नवीन वाहनाच्या पशासाठी?

मयत कारभारी सावळेराम खामकर यांच्या नातवाने नवीन वाहन घेण्यासाठी त्याचेकडे पशांची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. पैसे देण्यास विरोध झाल्याने रागाच्या भरात सून व नातवानेच गळा आवळून हत्या केली असल्याचा संशय लोणी पोलिसांना आहे. त्यामुळे केवळ पशासाठीच सून व नातवाने आजोबांची हत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:00 am

Web Title: daughter in law grandson get police custody in 80 year old man murder case
Next Stories
1 नांदुऱ्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
2 चाऊर चाऊर चांगभलं… बळीराजाची आरोळी, वेळ अमावस्येनिमित्त शेतशिवार गजबजले
3 नागपूरमध्ये पैशाच्या वाटणीवरुन तरुणाची हत्या
Just Now!
X