नाशिकच्या सातपूर भागात असलेल्या ध्रुवनगर भागातल्या एका बांधकाम प्रकल्पात पाण्याची १५ हजार लीटर क्षमतेची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एकजण जखमी झाला. नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अपना घर या गृहप्रकल्पाचे काम सातपूर या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसाठी दोन जलकुंभ तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले होते. त्यापैकी एका टाकीला गळती लागली होती. मात्र आज ही टाकी कोसळली या टाकीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने तिघांचा मृत्यू झाला. तिघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तिथे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. या ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. मात्र तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. विधानसभेत पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे यावेळीही या घटनेचे पडसाद उमटले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घटना लक्षात आणून देत याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल जे दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.