हृदय हेलावणारी घटना ; दोषींवर कारवाईची मागणी

पंढरपूर येथे एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत येथील सामान्य रुग्णालयात आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनानंतर शवागरात ठेवण्याऐवजी पोत्यात बांधून ठेवलेला आढळून आला. हृदय हेलावणारी घटना होऊनही रुग्णालय प्रशासन मात्र या प्रकरणाची चौकशी करू असे शासकीय उत्तर देत आहे.

पंढरपूर  हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक वृद्ध, निराधार व्यक्ती येत असतात. यातील काही जणांचा मृत्यूदेखील होतो. या अशा बेवारस व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सामान्य रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाची आहे. मृत झालेल्या बेवारस व्यक्तीचे शव विच्छेदन करून शवागृहात ठेवले जाते. ४ ते ५ दिवस मृत बेवारस व्यक्तीच्या कुटुंबाची माहिती घेऊन कोणी आले नाही  तर त्या व्यकतीवर अंत्यसंस्कार केले जातात.

या पाश्र्वभूमीवर ही हृदय हेलावणारी घटना नुकतीच उघडकीस आली. येथील एक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे हे एका मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आले असता त्यांना इथे बाहेर एका कपाटात पोते बांधलेले दिसून आले. या पोत्यातून अतिशय घाण वास येत असल्याने पाहणी केली असता त्यामध्ये सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या बाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शवविच्छेदन केल्यानंतर पुढची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. दरम्यान यानंतर सामान्य रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. माया शेळके यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यावर त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच चौकशीनंतर दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच पोलिसांनी या मृत व्यक्तीचे कोणी नातेवाईक आहेत का याचा शोध घेण्यासाठी हा मृतदेह ४ ते ५ दिवस ठेवला होता असे सांगण्यात आले. परंतु अशावेळी हा मृतदेह हा शवागृहात अथवा बर्फाच्या पेटीत ठेवणे अपेक्षित असते. मात्र इथे हा मृतदेह चक्क एका पोत्यात बांधून बाहेर कपाटात आणून ठेवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर यावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली. याची चौकशी करत दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.