रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकांना यश आले आहे. सह्याद्री ट्रेकर्स पथक, स्थानिक आदिवासी आणि पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रेमी युगुलाने शनिवारी टकमक टोकावरून खोल दरीत उडी मारली होती. लता मुकणे आणि सोनू जगताप अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे सोनू आणि लता यांचे लग्न ठरले होते. मात्र तरीही दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकलेले नाही.

महाड तालुक्यातील कुंभार्डे आदिवासी वाडी येथील लता मुकणे आणि तिचा प्रियकर सोनू जगताप शनिवारी रायगड किल्ल्यावर पावसाळी पर्यटनासाठी आले होते. यावेळी लता हिचा चुलत भाऊ राहुल मुकणे त्यांच्यासोबत होता. टकमक टोकावर दोघांनी राहुलला दोघांचे फोटो काढायला सांगितले. राहुल फोटो काढत असताना अचानक दोघांनी टकमक टोकावरून खोल दरीत उडी मारली.

राहुलने घडलेला धक्कादायक प्रकार स्थानिक पोलिसांना सांगितला. यानंतर सह्याद्री ट्रेकर्स, स्थानिक आदिवासी बांधव आणि पोलिसांनी शोध आणि बचाव मोहिम सुरू केली. मात्र रात्र झाल्याने शनिवारी ही शोध मोहिम थांबवण्यात आली. यानंतर रविवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. खोल दरीत उतरून ट्रेकर्सनी दोघांचाही शोध सुरु केला. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. अखेर सायंकाळी ५ च्या सुमारास दोघांचेही मृतदेह आढळून आले.

महाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील, पोलीस नाईक आशुतोष म्हात्रे, प्रशांत मोरे, रमेश दोरे, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव आणि महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स यांनी या तपास मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.