सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. दरम्यान, या प्रकारानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांनी मुलीसह तिच्या मुलांचा खून केल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. पाटोदा तालुक्यातील डोळेवाडी येथे या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डोळेवाडी येथील विवाहिता राणी आजीनाथ डोळे (वय २७) ही आकाश व आदर्श या दोन मुलांसह सहा दिवसांपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली. शुक्रवारी सकाळी गावाजवळील शिवारातील विहिरीत बेपत्ता महिलेसह मुलांचे मृतदेह आढळून आले. मृत महिलेचे माहेर तालुक्यातीलच कापसी आहे. माहिती मिळताच मोठय़ा संख्येने नातेवाईकांनी डोळेवाडीकडे धाव घेतली.
सासरच्या लोकांनी खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप करीत सासू, सासरे व पतीला समोर आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाटोदा पोलिसांनी मध्यस्थी करीत विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतदेह बाहेर काढताना मृत महिलेच्या एका पायाला व हाताला दोन्ही मुलांना बांधण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. त्यामुळे हा घातपात की आत्महत्या,  या बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.