पैशाच्या देवाणघेवाणीतून उदगीर शहरातील देगलूर रस्त्यावरील प्रवीण सूर्यवंशी याचा खून करून मृतदेह रेल्वेरुळावर टाकण्यात आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
उदगीरच्या लालबहादूर शास्त्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रवीण बालाजी सूर्यवंशी याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र कांबळे (विकासनगर, उदगीर) याच्या मदतीने व्हिडिओ शूटिंग केले होते. या कामापोटी सूर्यवंशीला ६ हजार रुपये मिळाले. यातील अर्धी रक्कम आपल्याला द्यावी, या साठी कांबळे याने प्रवीणकडे तगादा लावला. कांबळे याने साथीदारांसह प्रवीणला मारहाण केली. यानंतर प्रवीणचा भाऊ रुपकांत याने तडजोड करून १ हजार रुपये कांबळे यास दिले होते. मात्र, आणखी २ हजार रुपये द्यावेत, यासाठी प्रवीणला बंदिस्त करून ठेवले. दोन हजार रुपये दिल्याशिवाय प्रवीणला सोडणार नाही, अशी मोबाईलवर धमकी दिली. रुपकांतने २ हजार रुपये देऊन प्रवीणची सुटका केली.
यानंतर बुधवारी (दि. ६) संध्याकाळी सातच्या सुमारास प्रवीण घराबाहेर पडला, तो परतलाच नाही. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह  रेल्वेरुळावर पडल्याची माहिती मोबाईलवर रुपकांतला मिळाली. मृतदेह भावाचा असल्याची खात्री झाल्यानंतर रुपकांतने उदगीर पोलीस ठाण्यात भावाच्या खूनप्रकरणी फिर्याद दिली. या प्रकरणातील आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी गुरुवारी दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी देवेंद्र कांबळे व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा नोंदवला.