शीव रुग्णालयाचा नवा खुलासा; ३६ जण विलगीकरणातच

सांगली : खेराडी-वांगीतील मृताचे नाव चुकून करोनाबाधितांच्या यादीमध्ये आले असल्याचा खुलासा मुंबईच्या सायन रुग्णालयाने  केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. तथापि, या गोंधळामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या ३६ जणांचे विलगीकरण केले आहे आणि या सर्वाची दुसरी करोना चाचणी करूनच त्यांची मुक्तता होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

मुंबईस्थित एका रुग्णाचे १८ मार्च रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचे मूळ गाव कडेगाव तालुक्यातील खेराडे-वांगी असल्याने पार्थिवावर गावी अंत्यविधी करण्यात आले.

मात्र २२ मार्च रोजी सायन इस्पितळाच्या यादीमध्ये या  मृत व्यक्तीचा करोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. यामुळे अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या ३० जणांना संस्था विलगीकरण कक्षात दाखल करून त् चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा पहिला अहवाल नकारात्मक आला आहे.

दरम्यान, करोना बाधित रूग्णाचे पार्थिव अहवाल येण्यापूर्वीच नातेवाइकांच्या ताब्यात कसे देण्यात आले असा सवाल राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा  प्रशासनाकडूनही सायन इस्पितळाकडे अधिकृत अहवालाची मागणी केली. यावेळी सायन इस्पितळाच्या प्रशासनाचा अहवालातील गोंधळ समोर आला. या रूग्णाचे नाव चुकून करोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले. या रूग्णाचा करोना चाचणीसाठी स्वॅबचे नमुनेच घेण्यात आले नव्हते असा खुलासा रूग्णालयाच्यावतीने करण्यात आला आहे.

दरम्यान,  सध्या जिल्हयात १७१ जण  संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल आहेत.