दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून प्राणघातक हल्ल्याचा प्रकार सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे घडला. याप्रकरणी कुलदीप संपत भोसले (वय २८) याच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेश नामदेव मंडले (वय २६, रा. चिकमहूद) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कुलदीप भोसले याने कटफळ येथे एका हॉटेलात दारू पिण्यासाठी राजेश यास पैसे मागितले असता त्यास त्याने नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. त्या वेळी कुलदीप याने शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात राजेश याने त्यास चापट मारली होती. परंतु त्यामुळे झालेल्या अपमानाचा सूड उगविण्यासाठी कुलदीप याने राजेश याच्या खुनाचा डाव रचला.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास राजेश मंडले हा चिकमहूद गावात आपला मित्र रविराज ब्रह्मदेव भोसले याच्या खोलीत त्याच्या सोबत गप्पा मारत बसला असताना कुलदीप भोसले हा तेथे हातात कोयता घेऊन आला. तुला मस्ती आली आहे, आता तुला जिवंत सोडणार नाही, असे ओरडत त्याच्या हातातील कोयत्याने राजेश याच्यावर प्राणघातक हल्ला केला.

चेहऱ्यावर, गळ्यावर आणि डोक्यावर कोयत्याचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्राणघातक हल्ल्याचा प्रकार असल्याने त्यानुसार पोलिसांनी कुलदीप भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तो पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

अज्ञात व्यक्तीचा खून

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे भीमा नदीच्या पात्रात ५५ वर्षांच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा खुनाचा प्रकार असल्याने त्यानुसार मंद्रूप पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृत पुरुषाची ओळख पटली नाही. त्याच्या छातीवर, गळ्यावर, उजव्या दंडावर, कपाळावर ठिकठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार झाले आहेत. खून केल्यानंतर गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.