औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत ‘कॉक्लिअर इंप्लांट’ शस्त्रक्रिया

संदीप आचार्य/ सुहास सरदेशमुख,  मुंबई

जन्मत: कर्णबधिर असलेल्या तीन वर्षांच्या राजूवर लवकरच औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात ‘कॉक्लिअर इंप्लांट’ शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी लागणारे साडेसात लाख रुपये त्याच्या शेतकरी असलेल्या वडिलांकडे नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मराठवाडय़ातील पाच वर्षांच्या आतील १०० कर्णबधिर मुलांवर आगामी वर्षांत मोफत ‘कॉक्लिअर इप्लांट’ शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे राजूसारख्या अनेक कर्णबधिर रुग्णांच्या शस्त्रक्रिया होऊन त्यांना श्रवणशक्ती प्राप्त होणार आहे.

या शस्त्रक्रियांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ व ‘टाटा ट्रस्ट’ यांच्याकडून हेडगेवार रुग्णालयात आर्थिक मदत मिळणार असून या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. या योजनेअंतर्गत टाटा ट्रस्टकडून प्रति रुग्ण पाच लाख रुपये तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये देण्यात येणार असून उर्वरित खर्च हा हेडगेवार  रुग्णालय व रुग्णाकडून घेतला जाणार आहे.

जन्मत: कर्णबधिर असलेल्या बालकांवर पाच वर्षांच्या आत प्रामुख्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येत असून शस्त्रक्रियेनंतर सुमारे दीड वर्षे बालकाला बोलण्यास शिकवावे (स्पिच थेरपी) लागते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने या शस्त्रक्रिया मुंबई व नागपूर येथे केल्या जात होत्या. तथापि मराठवाडय़ातील रुग्णाची संख्या व शस्त्रक्रियेनंतर स्पिच थेरपीसाठी दीड वर्ष मुंबईत ठेवणे पालकांना परवडणारे नसल्यामुळे हेडगेवार रुग्णालयाबरोबर सामंजस्य करार करून मराठवाडय़ातील रुग्णांच्या तेथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. गुरुवारी या योजनेचे हेडगेवार रुग्णालयात उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबादचे हेडगेवार रुग्णालय हे मराठवाडय़ातील गोरगरीब रुग्णांसाठी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जीवनदायी ठरले आहे. सुमारे ३०० खाटांच्या या रुग्णालयात अत्यल्प दरात रुग्णांवर उपचार केले जातात. दररोज १२०० रुग्ण बा रुग्ण विभागात उपचारासाठी येतात तर वर्षांकाठी १० हजार छोटय़ा मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या जातात. वर्षांला येथे हृदयरुग्णांवर सुमारे २०० अँजिओप्लास्टी केल्या जातात तर ४०० हृदय शस्त्रक्रिया येथे होतात असे रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रसन्न पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांत सुमारे १००० हून अधिक कर्णबधिर मुलांवर ‘कॉक्लिअर इप्लांट’च्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्या प्रामुख्याने हिंदुजा, केईएम, जसलोक, एसआरसीसी व नागपूर येथील ऑरेंज सिटी येथे करण्यात आल्या आहेत. मराठवाडय़ातील मुलांना शस्त्रक्रियेनंतर मुंबईत ‘स्पिच थेरपी’साठी सहा महिने येणे कठीण होत असल्यामुळेच औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेटय़े यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून येथील कान-नाक-घसा उपचार विभागात कॉक्लिअर इंप्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ डॉक्टर आमच्याकडे आहेत तसेच शस्त्रक्रियेनंतर पुढील सहा महिने या मुलांना स्पिच थेरपी देणारे डॉक्टरांचे उत्तम पथक आमच्याकडे असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रसन्न पाटील यांनी सांगितले. आजघडीला सुमारे १०० हून अधिक मुले शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत असून यातील बहुतेकांकडे त्यासाठी पैसे नाहीत. यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख ओम शेटय़े यांच्याकडे संपर्क साधल्याचे डॉ. पाटील म्हणाले. यानंतर भराभर सूत्रे हलली, व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून येथे होणाऱ्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेचा मोठा खर्च उचलण्याचे मान्य करण्यात आले. सुमारे सात लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधी व टाटा ट्रस्ट आम्हाला देणार असून उर्वरित खर्च रुग्णालय व रुग्णाचे नातेवाईक उचलतील जेणेकरून १०० हून अधिक शस्त्रक्रिया मोफत करणे आम्हाला शक्य होईल, असेही पाटील म्हणाले.