राज्यात करोनारूपी संकटाने थैमान घातलेलं असताना, आता विविध रूग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे नागरिकांमधून आरोग्य व प्रशासकीय यंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्यानंतर, आता विरारमधल्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये घडलेल्या भयनाक आगीच्या घटनेत १३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या भयानक घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. तर, विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

धक्कादायक : विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू

“ “सुसाईट डेस्टिनेशन”ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

“राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

तसेच, “महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. करोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला.” असा आरोप देखील प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Virai Hospital Fire : “मुख्यमंत्री फक्त म्हणतात ऑडिट करू, पण…!” देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका!

याचबरोबर “राज्य सरकार आता तरी जागे व्हा!! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे राज्य सरकार ‘जबाबदार’ आहे.” असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

“विरार येथील विजय वल्लभ कोविड केअर रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त अतिदक्षता विभागाची तातडीने पाहणी केली. अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नयेत याची आरोग्य विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे.” असं प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलून दाखवलं आहे.

विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश; म्हणाले…

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.