एकीकडे तरुण मुलाचा अपघाती मृत्यू, तर दुसरीकडे अर्धापूर पोलिसांची कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची संवेदनशून्यता अशा कात्रीत बारड येथील पानगुडे परिवाराला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
बारड येथील माधव एकनाथ पानगुडे (वय ३२) हा तरुण हॉटेलमध्ये काम करीत होता. नेहमीप्रमाणे काम आटोपून तो रात्री घरी गेला. परंतु मालकाचे बोलावणे आल्यामुळे तो पुन्हा मध्यरात्री घराबाहेर पडला. दीड वाजता हॉटेलकडे जात असताना आमराबाद पाटीजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला घरी बोलावण्यास आलेल्या नोकराला गंभीर दुखापत झाली. महामार्ग पोलिसांनी या दोघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच माधवला मृत घोषित करण्यात आले.
माधवच्या मृत्यूची खबर महामार्ग पोलिसांनी रात्री दीडलाच अर्धापूर पोलिसांना दिली. अपघाताची माहिती समजल्यानंतर पंचनामा व अन्य कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सकाळी लवकर येणे अपेक्षित होते. अर्धापूर पोलीस ठाण्याशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. परंतु संबंधित बीटचे जमादार आले नाहीत. ते आल्यावर त्यांना पाठवण्यात येईल, अशी टोलवाटोलवी पोलिसांनी केली.
एकीकडे तरुण मुलाचा अपघाती मृत्यू, तर दुसरीकडे पोलिसांची संवेदनशून्यता अशा कात्रीत पानगुडे परिवाराला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अर्धापूर पोलीस येऊन पंचनामा करीत नाहीत, तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर पानगुडे यांच्या हितचिंतकांनी पोलिसांना साकडे घातले. अपघातानंतर तब्बल १२ तासांनी, दुपारी दीड वाजता अर्धापूरचे पोलीस आले. त्यानंतर तीनच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांच्या संवेदनशून्यतेबाबत अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस अधीक्षकांनी या दृष्टीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील पोलीस दलात कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे ठाण्यातील अधिकाऱ्यांवर म्हणावे तेवढे नियंत्रण नसते. परिणामी कितीही महत्त्वपूर्ण किंवा गंभीर घटना घडली, तरी पोलीस सर्व आलबेल असल्याच्या आविर्भावात असतात. चोरी, दरोडा असो, खून, खुनाचा प्रयत्न असो किंवा एखादा अपघात असो पोलिसांची संवेदनशून्यता वेळोवेळी प्रकर्षांने जाणवत आहे.