येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या एका ८३ वर्षीय वृद्ध करोनाबाधिताचा आज शनिवारी मृत्यू झाला. हा रुग्ण नेर येथील रहिवासी होता. या रुग्णास ‘सारी’चीही लक्षणे होती. आजच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हापासूनच त्याची प्रकृती गंभीर होती. या वृध्दाच्या मृत्यूमुळे यवतमाळ जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या तीन झाली आहे.

आणखी वाचा- पालघर : पोलीस कोठडीतील आरोपीला करोनाची बाधा; पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी क्वारंटाइन

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयास आज शनिवारी ३५ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी या मृतकाचा अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. विलगीकरण कक्षातील उपचारानंतर बरे झाल्यामुळे आज सुट्टी देण्यात आली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत १६८ व्यक्तींना करोना संसर्गाची लागण झाली असून १४३ जणांनी करोनावावर यशस्वी मात केली आहे, असे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.