१४ तासांहून अधिक काळ मृतदेह रस्त्यावर

विरार : नालासोपारा परिसरात एक  मृतदेह तब्बल १४ तासांहून अधिक काळ रस्त्यावर पडून होता. या व्यक्तीवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही व्यक्ती वसई-विरार महापालिका रुग्णालयात उपचारासाठी गेली असता त्याला तिथे दाखल करून न घेतल्याने, ती  रुग्णालयाच्या शेजारीच बसून होती, त्यात अचानक त्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री    मृत्यू झाला तरी रविवारी १२ वाजेपर्यंत हा मृतदेह तसाच रस्त्यावर पडून होता.

नालासोपारा विजय नगर परिसरातील ही घटना आहे. येथील दुकानदारांनी माहिती दिली की, मृत व्यक्ती ही कशाने तरी भाजली असल्याने मागील तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार करण्यास येत होती, पण त्याला उपचारासाठी दाखल करून घेत नसल्याने तो येथेच रस्त्यावर दुकानाच्या बाजूला बसून असे. त्यास आम्ही बिस्किट आणि औषधे देत होतो, पण शनिवारी रात्री अचानक तो हलत नसल्याचे आम्ही पाहिले. या संदर्भात पोलिसांना वारंवार फोन केले, मात्र कुणीही आले नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत त्याचा मृतदेह तसाच पडून होता. त्याला माशा लागल्या होत्या. शेवटी दुपारी तुळींज पोलिसांनी हा मृतदेह हलवला.

सध्या वसई-विरारमध्ये करोनाचे गडद संकट उभे असताना सदर घटनेने पोलीस आणि पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या संदर्भात विचारणा केली असता पालिका रुग्णालय पोलिसांच्या खांद्यावर तर पोलीस आरोग्य यंत्रणेला जबाबदार मानत आहेत. सदर घटनेमुळे विजयनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. कारण मयत व्यक्ती ही करोनाबाधित होती की नाही याचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे सदरची व्यक्ती ही मागील तीन-चार दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आली आहे.

आरोग्य व पोलीस प्रशासनात समन्वयाचा अभाव

पालिका रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल चौधरी यांनी रुग्णावरील उपचाराबाबत माहिती देताना सांगितले की, पालिका रुग्णालयात या इसमावर दोन वेळा उपचार केले, पण तो भाजला असल्याने त्याला उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले होते. तसेच आम्हाला मृतदेहाची सूचना मिळाली, परंतु पोलीस आल्याशिवाय आम्ही पुढील कारवाई करू शकत नव्हतो. दरम्यान, तुळींज पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी सांगितले की, सध्या करोनाकाळ असल्याने वैद्यकीय माहितीशिवाय आम्ही बेवारस मृतदेह हाताळत नाहीत. आम्ही अनेक वेळा फोन केल्यानंतर रविवारी दुपारी पालिकेच्या डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला. यामुळे मृतदेह उचलण्यास विलंब झाला. या संदर्भात पोलिसांनी डायरीतसुद्धा नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकाचा शोध सुरू आहे.