तालुक्यातील कुसुंबा येथील एका महिलेला महापालिकेच्या आयटीआय येथील केंद्रातून अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. तेथे महिलेला करोना नसल्याचे सांगत घरी पाठविण्यात आले. परंतु, करोना सकारात्मक असा अहवाल आलेल्या या महिलेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.

कुसुंबा येथील एका महिलेस त्रास जाणवू लागल्याने त्यांना १० सप्टेंबर रोजी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तेथे करोनाची तपासणी करण्यास सांगितले. तपासणीत महिलेचा अहवाल करोना सकारात्मक आला. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आयटीआय येथील कोविड के ंद्रात दाखल करण्यात सांगितले.

दुसऱ्या दिवशी महिलेला अत्यवस्थ वाटू लागले. आयटीआय येथील डॉक्टरांनी संदर्भ पत्र देवून शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्र वारी सकाळी डॉक्टरांनी महिला रुग्णाच्या तपासणीचे कुठलेही कागदपत्र  न पाहता घशाला संसर्ग असल्याचे सांगितले.  अशक्तपणा असल्याने ग्लुकोजची बिस्किटे खा आणि पाणी प्या, असा सल्ला देत घरी जाण्यास सांगितले.

सोमवारी सकाळी घरी महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी ११ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जागा नसल्याने रुग्ण दाखल करून घेतला नसेल, असे उत्तर दिले.

मयत महिलेच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्याकडे कैफियत मांडली. यावेळी डॉ. रामानंद यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.