सांगलीचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने शहरात गेल्या आठ दिवसांत १६ पाखरांचा तीव्र उष्माघाताने बळी गेला असून ‘इन्साफ फौंडेशन’ला तीव्र उन्हामुळे शहरातच्या विविध भागात २८ पक्षी रस्त्यावर पडल्याचे आढळून आले. प्रथमोपचार करून हे पक्षी पुन्हा अधिवासात रवाना करण्यात आले.

शहरात तीव्र उष्णतेची लाट आली असून शनिवारपासून हवेतील उष्मा वाढतच आहे. गेल्या आठवडय़ापासून सरासरी तपमान ४० अंशांवर पोहचले असून रविवार व सोमवारी तापमापकातील पारा ४२ अंशांपर्यंत पोहचला आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर तर झालाच असून रस्त्यावरील वर्दळ कमालीची घटली आहे. बाजारपेठेतील व्यवहारही सकाळी ११ नंतर तुरळकच होत आहेत.

वाढत्या उन्हाचा सर्वाधिक त्रास मुक्या पाखरांना होत असून तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांना उष्माघात होत आहेत. सोमवार अखेर मिरज, सांगली, कूपवाड, माधवनगर परिसरात १६ पक्षी उष्माघाताने मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये चिमण्या-३, तांबट-३, घुबड-१, घार-२, विवर-१, पानकोंबडी-२, बुलबुल-१, रॉबीन-१, कावळा-१ आणि साळुंखी-१ असे पक्षी उष्माघाताने मृत्युमुखी पडले आहेत.

गेल्या चार दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे शहरात अचानकपणे रस्त्यावर पक्षी चक्कर येउन पडण्याचे प्रमाणही वाढले असून त्यांना तत्काळ उपचार करण्यासाठी इन्साफ फौंडेशनचे कार्यकत्रे तत्परतेने धावत असल्याचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितले. अशा २८ पक्ष्यांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. एखादा पक्षी रस्त्यावर पडल्याचा फोन आल्यानंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या पक्षाला ताब्यात घेऊन त्याला नसíगक थंडावा देण्याचा प्रयत्न केला जातो.

पक्षी उष्माघाताने चक्कर येउन पडला असेल, तर त्याला तत्काळ पाणी पाजण्याचा प्रयत्न झाल्यास मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. कारण चोचीतून पाणी पाजले तर ते पाणी थेट फुफ्फुसामध्ये अथवा श्वास नलिकेत गेल्याने पक्षी गतप्राण होतो. यामुळे त्याला सुती कापड भिजवून दर ५ मिनिटाला त्याचे शरीर थंड करण्याचा प्रयत्न करून नसíगक रीत्या तो पक्षी पाणी पिण्यासाठी सक्षम करणे हाच त्याच्यावर उपाय आहे.

उष्माघाताने पक्षी जमिनीवर पडल्यानंतर काही लोक तत्काळ त्याच्यावर पाणी ओतण्याचा प्रयत्न करतात. यामुळे शरीर एकदम थंड होत असल्याने हृदयाचे स्पंदन बंद पडून त्याचा मृत्यू ओढवला जाउ शकतो. तीव्र उन्हामुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होत असल्यानेही पक्ष्याचा मृत्यू होत असल्याचेही मुजावर यांनी सांगितले.

तीव्र उष्णतेच्या लाटेमध्ये अनेक नागरिकांनी घराच्या गच्चीवर बाल्कनीमध्ये पाण्याची व्यवस्था केली असून इन्साफ फौंडेशननेही मिरजेत ८, कूपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये ७ आणि सांगली शहरातील विविध भागात विशेषत मार्केट यार्डात १५ ठिकाणी पाखरासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाखरांसाठी केवळ डब्यात पाणी न ठेवता त्यांना शरीर थंड करण्यासाठी उथळ स्वरूपात पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यात करण्यात आला आहे.