चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 उच्चस्तरीय चौकशीची मागणी

चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार तथा जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यानंतर करोनाचे सर्वाधिक १ हजार २७५ मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. प्राणवायू, व्हेंटिलेटर खाटांची कमतरता, औषधांचा तुटवडा, डॉक्टर तथा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमी, नियुक्तीचे अधिकार असतानाही डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीला नकार, यामुळे दररोज वीस ते तीस करोना मृत्यू होत आहे. या सर्व मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करावी, हा प्रकार अतिशय गंभीर व जनतेत भीती निर्माण करणारा आहे, तेव्हा वेळीच लक्ष द्या, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल व जनता उग्ररूप धारण करणार, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा प्रदेश काँग्रस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून दिला आहे.

विदर्भात सर्वत्र मृत्यूचे प्रमाण कमी होत असताना या जिल्ह्यात मृत्यूचा आकडा ‘जैसे थे’ आहे, ही चिंताजनक बाब आहे. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेच मृत्यूची संख्या वाढत आहे. खनिज विकास निधी हा हक्काचा भरमसाठ पैसा असताना व जिल्हा नियोजन फंडातून तीस टक्के खर्चाचे अधिकार जिल्हा प्रशासनाला असताना देखील डॉक्टर तथा इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणे काय, या संपूर्ण मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पुगलिया यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करून एक दिवसाचे पगारातून जमा निधीतून पाच एमडी डॉक्टरांची नियुक्त करू शकतात, त्यांना एक लाख रुपये पगार देऊ शकतात, मग पालकमंत्री विजय वडेट्टीवार हाच निर्णय का घेऊ शकत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

जागतिक आरोग्य संघटना तथा केंद्र व राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी योग्य नियोजन करणे अपेक्षित आहे. उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता व आयुक्तांनी शपथपत्र दिले आहे. डॉक्टर तथा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिकचा पगार देऊन त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी, रुग्णांना औषध व इतर साहित्याचा पुरवठा करावा, रुग्णांचे प्राण वाचवावे, असेही पुगलिया यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री  २० मे रोजी जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे. -नरेश पुगलिया, माजी खासदार