25 May 2020

News Flash

रुग्णवाहिका न मिळाल्याने प्रसूतीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू

गोरेगावमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली

पूजा झुंजार

केवळ रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही म्हणून एका मराठी अभिनेत्रीचा आणि तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २५ वर्षीय पूजा झुंजार या अभिनेत्रीचा आणि तिच्या नवजात बालकाचा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप पूजाच्या नातेवाईकांनी केला आहे. गोरेगावमध्ये राहणाऱ्या पूजाला शनिवारी रात्री उशीरा प्रसूती कळा येऊ लागताच तिच्या माहेरच्यांनी तिला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास पूजाची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांमध्ये बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजा यांची प्रकृती खालावली. पूजा यांना पुढील उपचारांसाठी हिंगोलीमध्ये नेण्याचा सल्ला प्राथमिक उपचार केंद्रातील डॉक्टरांनी दिला. मात्र पूजा यांना हिंगोलीतील रुग्णालयात हलवण्यासाठी केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा शोध घेण्यास पूजा यांच्या नातेवाईकांनी सुरुवात केली. मात्र ही रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि त्यामधून पूजा यांना हिंगोलीला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पूजा आणि त्यांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

पूजा यांना वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना उशीरा उपचार मिळाले म्हणूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित केला जात आहे. पूजा यांनी ‘फाल्गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्हा पावली’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. पूजा या सिने निर्माते विष्णू झुंजार यांच्या पत्नी होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 7:29 pm

Web Title: death of pooja zunjar and her baby in goragaon dist hingoli scsg 91
Next Stories
1 औरंगाबाद : ‘एमआयएम’ – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
2 #IndiaTodayExitPoll: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र’ सरकार, महायुतीला १६६ ते १९४ जागा मिळण्याचा अंदाज
3 राज ठाकरेंना धक्का देणारा EXIT POLL, जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार
Just Now!
X