लग्नाचा व-हाड घेऊन परतणा-या मालमोटारीला उच्च दाबाच्या विद्युततारेचा स्पर्श झाल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य २१ जण जखमी झाले. मोहोळ तालुक्यातील वाघोलीवाडीजवळ ही दुर्घटना घडली. मालमोटारीच्या टपावर बसल्याने दोघा तरुणांना विद्युतधक्का बसला व त्यांना प्राण गमवावे लागले.
सतीश स्वामिनाथ वळदंडे (१६) व परमेश्वर शरणप्पा बिराजदार (१८, रा. हालहळ्ळी, ता. अक्कलकोट) अशी दोघा मृतांची नावे आहेत. हालहळ्ळी येथील चंद्रकांत हुक्केरी यांची मुलगी रूपाली हिचा विवाहसोहळा मोहोळ तालुक्यातील वाघोलीवाडीतील गणेश शिवशेट्टी याजबरोबर पार पडला. या विवाहसोहळय़ासाठी हालहळ्ळीतून वधूकडील वऱ्हाडी मंडळी टेम्पो व मालमोटारीत बसून आली होती. अक्षतासोहळा संपन्न होऊन उशिरा जेवण उरकल्यानंतर ही वऱ्हाडी मंडळी हालहळ्ळी गावाकडे परतण्यासाठी निघाली. परंतु पुढे जवळच अंतरावरील कालव्यावर चढावरून मालमोटार धावत असताना वरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युततारेचा स्पर्श मालमोटारीच्या टपाला झाला. काही तरुण मालमोटारीच्या टपावर बसली होती. परंतु विद्युततारेचा स्पर्श होऊन विद्युतधक्का बसल्याने दोघांना जीव गमवावा लागला. संपूर्ण मालमोटारीत विद्युतप्रवाह उतरल्यामुळे त्यात २१ जण भाजून जखमी झाले.
जखमींना तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागनाथ वळदंडे (२०), राजकुमार धनशेट्टी (३४), किरण बिराजदार (१८), सोमनाथ बोराळे (२२), महेश ढब्बे (२२), दिलीप बिराजदार (२०), मल्लिनाथ बिराजदार (२०), शशिकांत धनशेट्टी (१८), हणमंत बिराजदार (१९), सोमनाथ स्वामी (१७), संतोष किरनाळे (१४), गणेश बिराजदार (२३), गुरुनाथ वळदंडे (३२), रेवप्पा बिराजदार (२०), शिवप्पा स्वामी (२०), शरणप्पा ढब्बे (२२), शिवानंद गोविंदे (३२) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांनी वाघोलीवाडीस भेट देऊन अपघाताचे निरीक्षण केले. अपघात घडलेल्या रस्ता छोटा व सव्र्हिस रोड आहे. तेथून जड वाहनांना रहदारी करता येत नाही, तर या रस्त्याचा वापर छोटय़ा वाहनांना करता येईल. कालव्याच्या भरावामुळे मालमोटार तेथून जाताना मालमोटारीच्या टपावर बसलेल्या  तरुणांचा मालमोटारचालकाला अंदाज आला नसावा, असे विद्युतयंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.