उशिरा आलेल्या परीक्षार्थीच्या पतीला हृदयविकाराचा झटका; नांदेडमधील घटना

कृषी सहायक पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या पाच मिनिटे उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याशी झालेल्या वादानंतर तणावातून संबंधित उमेदवाराच्या पतीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विष्णुपुरी येथील होरायजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. गजानन शंकरराव देशमुख असे या व्यक्तीचे नाव आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील गजानन देशमुख यांची पत्नी मुक्ता यांचे कृषी सहायक पदाच्या परीक्षेचे केंद्र होरायझन इंग्लिश स्कूल होते.  परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची वेळ साडेनऊची असल्याने पाच मिनिटे उशीर झाला म्हणून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या कारणावरून तेथील कर्मचाऱ्याशी गजानन यांचा वाद झाला. या वादाच्या तणावातून त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी  मृतदेह पुन्हा होरायझनमध्ये नेऊन दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी करावी, अशी मागणी करत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली. घटनास्थळी ग्रामीण पोलीस  पोहोचल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले; परंतु नेमके त्याचवेळी कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता त्या वेळी वीज बंद झाल्याने चित्रण झाले नसल्याचे सांगण्यात आले. तसे शाळा व्यवस्थापनाकडून त्यांच्या नातेवाइकांनी लिहून घेतले व मृतदेह स्वीकारला.

गजानन यांना  चार वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा  मुलगा आहे.