माथेफिरूकडून फेसबुकचा वापर

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपचे आमदार अतुल सावे यांना शनिवारी रात्री एका तरुणाने फेसबुकवरून अश्लील भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या तरुणाने पोस्टमध्ये, माझे फडणवीस सरकारला आव्हान आहे की त्यांनी मला थांबवून दाखवावे, असेही म्हटले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे संबंधित आरोपीला अटक करण्याची मागणी केली. दुपारी धमकी देणारा संभाजीराजे भोसले याला सिटी चौक पोलिसांनी अटक केल्याचे आमदार सावे यांनी सांगितले.

संभाजीराजे भोसले या तरुणाने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की कधी पण मी कोणाचीही खून करू शकतो. पोलीस प्रशासनाला सर्व पुरावे देऊनही काही होत नाही. हे सर्व आमदार अतुल सावे यांचे कारस्थान आहे. कायदेशीर मार्गाने काही होत नाही म्हणून मला प्रतिष्ठित लोकांची हत्या करावी लागणार आहे. मिलिंद बापट, लक्ष्मीकांत जयपूरकर, दुर्गादास मुळे, महेश पूर्णपात्रे, सुनील जोगदेव या पाच लोकांपैकी कधीही कोणाचाही खून करू शकतो. या कामात कोणी मदत करण्यास राजी असेल, तर त्याने पुढे यावे, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

या घटनेची नोंद घेत रविवारी भाजपचे विभागीय प्रवक्ते शिरीष बोराळकर, तालुकाध्यक्ष गणेश नावंदर, विकास कुलकर्णी, सतीश खेडकर, गणेश जोशी आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाटे-घाडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये धमकी देणाऱ्यास अटक करून आमदार सावे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही

जीवे मारण्याची धमकी आल्याच्या पाश्र्वभूमीवर आमदार अतुल सावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही घटना मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपर्यंत नेण्याएवढी मोठी नाही. अशा प्रकारातून धमकी देणाऱ्यालाच महत्त्व दिल्यासारखे होईल. स्वत:वरील संतुलन गमावलेल्यांकडून अशा घटना घडतात. आरोपीला सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे.

– अतुल सावे, आमदार.

आरोपीला अटक

आमदार सावे यांना धमकी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन आरोपीला अटक करण्याची व संरक्षण देण्याची मागणी केली. आरोपीला अटक केली आहे. आमदार सावे यांच्याकडे सध्या सुरक्षारक्षक आहेत. आणखी संरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त.