केज नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत उमेदवारी मिळविण्यावरून झालेल्या शह-कटशहानंतर पक्षाचे अक्षय मुंदडा यांनी नाराजी व्यक्त करत लाभार्थी नेत्यांबरोबर निष्ठावंत निवडणूक लढवू शकत नाहीत, असे स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे सभापती बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधला. सोनवणे यांनीही पक्षात स्वयंघोषित निष्ठावंत कोण, असा पलटवार केल्याने मतदानापूर्वीच हुडहुडी भरलेल्या थंडीतही राजकीय वातावरण मात्र गरम झाले आहे.
 केज नगरपंचायतीची निवडणूक १८ जानेवारी रोजी आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील यांच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत काढून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. दिवंगत विमल मुंदडा यांचा मुलगा अक्षय मुंदडा मतदारसंघात पक्षाचे नेतृत्व करतात. विधानसभा निवडणुकीत त्यांची पत्नी नमिता मुंदडा यांचा पराभव झाला. या मतदारसंघावर विमल मुंदडा यांनी सलग चार वेळा विजय मिळवला होता. या पाश्र्वभूमीवर केज नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती असावीत यासाठी अक्षय यांचा प्रयत्न होता. मात्र पक्षांतर्गत स्पध्रेत पक्ष नेतृत्वाकडून जिल्हा परिषद सभापती बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे घेण्यात यश मिळवले. मुंदडा गटाला एकही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे अक्षय मुंदडा यांनी नाराजी व्यक्त करत एका निवेदनाद्वारे सोनवणे यांना लक्ष्य केले. केज शहराच्या विकासासाठी विमल मुंदडा यांनी सातत्याने प्रयत्न केले. सुख दुखात सोबत राहिल्या. परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही ‘लाभार्थी’ नेत्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली. ते लपून राहिले नाही. काही दिवसात पक्षात येऊन स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, सहकारात सत्तेचा लाभ घेतला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या िरगणात पाय खेचले. त्यामुळे भाजपला मदत करणाऱ्यांबरोबर राहण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा नाही, अशा शब्दात मुंदडा यांनी सोनवणे यांच्यावर निशाणा साधला. सोनवणे यांनीही पलटवार करत राष्ट्रवादीचे काही नेते व त्यांचा परिवारच शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे भासवित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुठे गेली होती ही स्वयंघोषित एकनिष्ठता? अंबाजोगाईत भाजपाचे लोक बोगस मतदान करून घेत असल्याचे कळवले, तेव्हा हे तथाकथित निष्ठावंत काय करत होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला.