हर्षद कशाळकर

अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर; दसरा मेळाव्यात ‘सीमोल्लंघन’ करण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेऊन काका-पुतण्यांमध्ये समन्वयही घडवून आणला होता. मात्र, तटकरे हे स्वत: किंवा त्यांच्या मुलांचाच विचार करीत असल्याने बंधू आणि पुतण्याने पुन्हा बंडाचे निशाण फडकविण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली आहेत. दोघांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तटकरेविरुद्ध तटकरे अशीच लढत श्रीवर्धन मतदारसंघात होऊ शकते.

रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत झाल्याची चर्चा असतानाच सोमवारी श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील अनिल तटकरे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे आग्रही होते. मात्र संदीप तटकरे यांना डावलून सुनील तटकरे यांनी आपले व्याही संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. यामुळे तटकरे कुटुंबातील वाद विकोपाला गेला होते. संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे दोघेही संदीप यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. मात्र निवडणुकीत संतोष पोटफोडे सहा मतांनी विजयी झाले होते. संदीप यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे तटकरे कुटुंबातील संबध अधिकच ताणले गेले होते.

अखेर तटकरे कुटुंबातील हा गृहकलह मिटावा म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार मध्यस्थी केली होती. बारामती येथे दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना बोलवून त्यांनी चर्चा केली. दोन्ही भावंडांना पक्षहिताच्या दृष्टीने एकत्रित काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपसातील वाद इथेच मिटवा अशी विनंतीही केली. यानंतर हा गृहकलह मिटल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण वादावर पडदा पडला तरी तटकरे कुटुंबाचे मनोमीलन होऊ  शकले नव्हते.

या काळात नाराज असलेल्या आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाच्या सक्रिय राजकारणातून अलिप्त राहणेच पसंत केले. एवढेच नव्हे, तर रोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नागरी सत्कारालाही अवधूत यांनी उपस्थित राहणे टाळले होते. विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही कुटुंबातील वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली. अनिल तटकरे ही निवडणूक लढवण्यास पुन्हा इच्छुक होते. मात्र अनिल तटकरे यांना डावलत सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेत याला उमेदवारी देऊन अन्य पक्षांतील मतांच्या आधारे निवडूनही आणले.

श्रीवर्धन मतदारसंघात पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत विद्यमान आमदार अवधूत तटकरे हे साशंक आहेत. आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे या तटकरेंच्या दोन्ही मुलांनी मतदारसंघाचा संपूर्ण ताबा घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदारसंघात मोठी कामे केली जात आहेत. हे सर्व करत असताना स्थानिक आमदारांना विचारातही घेतले गेले नाही. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. तेथे विजय मिळाल्यास विधानसभेसाठी कन्या आदिती हिचा विचार होऊ शकतो. लोकसभेत अपयश आल्यास सुनील तटकरे हेच उमेदवार असतील. या साऱ्या पार्श्वभूमीवर अवधूत तटकरे यांना शिवसेनेचा आधार वाटू लागला आहे.  शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दोघेही सीमोल्लंघन करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

शिवसेनेचा सावध पवित्रा

रोहा नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर संदीप तटकरे शिवसेनेत दाखल झाले होते. पण थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरताना त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली होती. तर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संदीप तटकरे शिवसेना सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील तटकरेंचे घर फोडले म्हणणारे शिवसेना नेते तोंडावर पडले होते. हा वाईट अनुभव पाठिशी असल्याने आता कोणताही निर्णय घेताना शिवसेना घाई करणार नसल्याचे दिसून येत आहे.

सुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. या अनुषंगाने त्यांनी पक्षबांधणी आणि निवडणूक तयारीलाही सुरुवात केली आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर कौटुंबिक वाद उफाळून आल्याने सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आधीच पक्षातील जुनीजाणती नेतेमंडळी पक्ष सोडून गेली आहेत. गेल्या पाच वर्षांत पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. या वादामुळे त्यात अधिकच भर पडण्याची शक्यता आहे.

‘मातोश्री’वर जाऊन मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पण मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळ आली की मी याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहे.  – अवधूत तटकरे, आमदार