अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या गाजलेल्या कादंबरीतला दुष्काळावरील उतारा वाचून सुरूझालेली ग्रंथिदडी, गुरांना चारा भरवून उद्घाटन आणि मराठवाडय़ातील जुन्या-नव्या लेखकांनी केलेली दुष्काळाची र्सवकष चर्चा अशा वातावरणात अण्णा भाऊ साठे दुष्काळ साहित्यसंमेलन येथे पार पडले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळय़ापासून ग्रंथिदडीने संमेलनास सुरुवात झाली. औपचारिकता आणि परंपरेला फाटा देऊन ‘फकिरा’ कादंबरीतील दुष्काळाचे वर्णन करणारा उतारा वाचून दाखवण्यात आला. शेंद्रा गावात गेल्या ३० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करून स्वमालकीची जमीन खरेदी करणारे शेतकरी उस्मानमामा यांच्या हस्ते गुरांना चारा देऊन संमेलनाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ लेखक शेषराव मोहिते यांच्यापासून ते तरुण नाटककार राजकुमार तांगडे यांच्यापर्यंत सर्व लेखकांची उपस्थिती हे संमेलनाचे वैशिष्टय़ ठरले. स्वागताध्यक्ष अरुण चव्हाळ यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट करताना साहित्य व दुष्काळ यांचा धागा उकलला.
संत तुकारामांनी दुष्काळात दिलेल्या कर्जमुक्तीचा हवाला देत तांगडे यांनी दुष्काळाच्या माध्यमातून कायम वंचितांना प्रश्नांच्या खाईत ढकलले जाते, असे सांगितले. वरकड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वच समाजघटकांनी आस्थापूर्वक विचार करण्याची गरज व्यक्त केली. पूर्वाध्यक्ष डॉ. केशव देशमुख यांनी नव्या पिढीतील लेखकांना भान देणारे हे संमेलन असल्याचे सांगितले. कवी इंद्रजित भालेराव यांनी साहित्यातले दुष्काळाचे संदर्भ देत मराठवाडय़ातील समकालीन सर्व लिहिणारी मंडळी उपस्थित आहेत. शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावे, त्यांना जगण्याचा आत्मविश्वास मिळावा यासाठी लेखकांनी लिहिण्याची गरज आहे, असे सांगितले. उद्घाटन सत्राचे संचालन दिलीप शृंगारपुतळे यांनी केले.
‘शेतकरी, शेतमजूर, दलित, महिला यांच्यावरील दुष्काळाचा खरा मारा थांबविण्यात आपण यशस्वी झालो आहोत का’ या विषयावरील कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादात कॉ. राजन क्षीरसागर, कृषिभूषण सोपानराव अवचार, मुरलीधर मुळे, अॅड. राजा कदम, माधव तेलंग यांनी सहभाग नोंदवला. ‘दुष्काळाचे खरे प्रतििबब साहित्यातून अथवा प्रसारमाध्यमांनी लोकांपर्यंत आणले आहे काय’ या विषयावर आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी, श्रीराम गव्हाणे यांनी सहभागी घेतला. दुष्काळ पाण्याचा नाही, तर धोरणांचाही आहे, असे कुलकर्णी म्हणाले. गव्हाणे यांनी दुष्काळ व साहित्य यांचा अनुबंध मांडला. लोमटे यांनी दुष्काळाचे चित्रण करणाऱ्या काही कलाकृती मराठीत असल्या तरी समग्र दुष्काळाला कवेत घेणारी महाकादंबरी अजूनही मराठीत नसल्याचे सांगितले.
कवी श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप झाला. दुष्काळाची जाणीव समाजातल्या सर्वच घटकांना असली पाहिजे, असे सांगून देशमुख यांनी संत तुकाराम, छत्रपती शिवाजीमहाराज यांचे संदर्भ देत दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगितले. डॉ. प्रभाकर हरकळ, संयोजक गणपत भिसे यांनीही विचार मांडले. संमेलनानिमित्त झालेल्या कवी संमेलनात शिवाजी अंबुलगेकर, विनायक पवार, विनायक येवले आदींनी कविता सादर केल्या.