घेतलेले कर्ज परत फेडण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांवर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर (महमंदाबाद) येथे घडला. या घटनेत बारा वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघे पती-पत्नी गंभीर भाजून जखमी झाले आहेत.

शरद सोपान घुंबरेचा (वय १२) होरपळून मृत्यू झाला. तर सोपान रामचंद्र घुंबरे (वय ४५) आणि त्याची पत्नी सोनाबाई (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी सोपान याने दिलेल्या जबाब तथा फिर्यादीनुसार त्याचा सख्खा भाऊ लक्ष्मण घुंबरे (वय ४२) याच्याविरूद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच त्याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान घुंबरे व त्याचा भाऊ लक्ष्मण घुंबरे यांच्यात त्यांनी पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यावरून वाद सुरू होता. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पुढाकार का घेत नाही म्हणून धाकटा भाऊ लक्ष्मण याने सोपान बरोबर भांडण सुरू केले होते. यातच संयुक्त कुटुंबासाठी असलेले रेशन कार्ड विभक्त करून मिळण्यासाठी केलेल्या अर्जातील त्रुटी दूर का करत नाही म्हणूनही लक्ष्मण सोपानशी भांडत होता. याच कारणांवरून त्यानं पहाटे सोपान याच्या घरी जाऊन त्याच्याशी भांडण केलं. त्यावेळी रागाच्या भरात सोबत आणलेले पेट्रोल त्यानं सोपान याच्यासह त्याची पत्नी आणि मुलाच्या अंगावर ओतले आणि त्यांना पेटवून दिलं. मंगळवेढा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.