मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱयावर आहेत. ते तळेगाव, सोनजंब, तिसगाव, शिंदवडला भेट देणार आहेत. दौऱयात त्यांनी दिंडोरीतल्या गारपिटीने उद्धवस्त झालेल्या द्राक्ष बागांचे पाहणी केली. या वेळी उपस्थित शेतकऱयांनी मुख्यमंत्र्यासमोर कर्जमाफीच्या जोरदार घोषणा दिल्या. तसेच द्राक्षांचे घड फेकून आपला संताप व्यक्त केला. शेतक-यांची परिस्थिती पाहता यावेळी फडणवीस यांनी शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली तसेच इतरही अनेक आश्वासने दिली.
फडणवीस यांच्या दौ-यादरम्यान शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी चिंताग्रस्त असलेल्या शेतक-यांनी आपल्या समस्यांचे पाढेच फडणवीसांसमोर वाचले. तर फडणवीस यांनीही शेतक-यांना आश्वासने देत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या घोषणेबरोबरच मुख्यमंत्र्यांनी कर्जवसुली आणि थकलेल्या वीजबिलांची वसुली थांबवण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात लवकरात लवकर गारपीटग्रस्त शेक-यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  गारपिटीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाबाबत केंद्रासोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.