कर्जबाजारीपणाला कंटाळून चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शुक्रवारी सकाळी झाडाला गळफास घेतला. सहकारी सोसायटीत वाढीव ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर होते. परंतु सोसायटीतील सचिवांनी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ते या निर्णयाप्रत आल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली.
श्रावण निवृत्ती जाधव (३८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व दोन मुली आहेत. कानमंडाळे गावातील विकास सोसायटीचे ४० हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. दुष्काळी व अवकाळी पावसाने सलग तीन वर्षे शेतीत नुकसान झाले. सहकारी सोसायटीचे ६० हजार रुपयांचे वाढीव कर्ज त्यांना मंजूरही झाले होते. आधीचे कर्ज वजा जाऊन १० हजार रुपये त्यांच्या हाती पडणार होते. लागवडीसाठी ही रक्कम उपयोगी पडेल म्हणून ते सोसायटी कार्यालयात गेले असता सचिवांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ते वैतागले. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. दुपारी शोकाकुल वातावरणात जाधव यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. विकास सोसायटीच्या कार्यशैलीचा किसान सभेचे अध्यक्ष राजू देसले यांनी निषेध केला.