नांदेडमधील कंधार तालुक्यात 60 वर्षांच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन मंगनाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.

कंधार तालुक्यातील फुलवळ गावातील शेतकरी अर्जुन मंगनाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यात बँकेचे कर्ज त्यांना फेडता आले नाही आणि व्याजाची रक्कम ही वाढतच होती. ह्या चिंतेने त्‍यांना ग्रासले होते. बुधवारी सकाळी ते म्हैस चारण्यासाठी गेले होते; परंतु बँकेच्या कर्जाचे विचार वारंवार येत होते. काही वेळाने मंगनाळे यांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कंधार पोलिसांनी अशोक मंगनाळे यांच्या फिर्यादीवरून आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली.

मंगनाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. मयत शेतकरी अर्जुन मंगनाळे यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सततच्या दुष्काळामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, कर्जाचा डोंगर यामुळे मराठवाड्यातील शेतकरी यंदाही बेजार झाले असून गेल्या महिनाभरात तब्बल ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.