कर्जबाजारीपणातून सांगलीत शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. गणेश प्रकाश पाटील (वय ३४) आणि लीलावती पाटील (वय ३१) असे या दाम्पत्याचे नाव आहे. राज्यात गेल्या पाच दिवसात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही चौथी घटना आहे.

कवठे महाकाळ तालुक्यातील जायगव्हाण या गावात गाणेश पाटील आणि त्यांची पत्नी लीलावती पाटील हे राहत होते. ते शेतातच राहायचे. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. ही दोन्ही मुले गणेशच्या आई- वडिलांकडेच होती. गणेशचे आई- वडील आजारी असायचे. यामुळे खर्च जास्त व्हायचा. यात भर म्हणजे नापिकीमुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्याने बुधवारी आत्महत्या केली. शेतातील घरातच या दाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली.

राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असून गेल्या पाच दिवसांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. धुळे तालुक्यातील नावरा येथील नबाबाई पाटील (५५) हिने नापिकी, दुष्काळ आणि कर्ज याला कंटाळून नऊ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात स्वत:ला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. तसेच  शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथील संभाजी  पाटील (३०) या शेतकऱ्यानेही कर्जाला कंटाळून सोमवारी सायंकाळी शेतातील झाडाला गळफास घेतला.. तर सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली होती. किसन लांडगे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून दुष्काळाची झळ अधिकच बसू लागल्याने किसन हा मानसिकदृष्ट्या खचला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.