कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. कर्जमाफी तात्परती मलमपट्टी आहे. शेतीतील उत्पादन खर्च आणि त्यातून मिळाणारे उत्पन्न यातील दरी जोवर कमी होणार नाही तोवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. शेतीवर अवलंबून राहणारी लोकसंख्या कमी करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला दर मिळवून देणे या दोन्ही बाजूंवर काम करावे लागले. शेतमालासाठी स्थिर आयात निर्यात धोरण ठरवे लागले असे मत स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडले. ते अलिबाग येथे जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आयोजित शोध मराठी मनाच्या संमेलनाच्या निमित्ताने भारत वस्रेस इंडिया या परिसंवादात बोलत होते. हरित क्रांतीमुळे देशात शेतीचे उत्पादन वाढले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न काही वाढले नाही. उलट उत्पादन खर्च आणि उत्पन्न यातील दरी वाढत गेली. शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या वाढली. दुसरीकडे शेतीक्षेत्र कमी होत गेले. निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत गेले. सरकारे बदलली, पण शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले.
ही परिस्थिती बदलायची असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी.
शेतमालाच्या उत्पादित मालाची साठवण करण्यासाठी गावागावात व्यवस्था निर्माण करायला हव्यात, काढणीपश्चात अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध व्हायला हवे.
कापणीपूर्व आणि कापणीनंतर होणारे शेतमालाचे नुकसान कमी व्हायला हवे, शेतमालाच्या आयात निर्यातीसंदर्भात स्थिर धोरण आखायला हवे. पतपुरवठा योग्य प्रकारे व्हायला हवा. हवामानाची अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळायला हवा तरच शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
कांद्याचे आणि दुधाचे दर वाढले तर आंदोलने केली जातात. ही मानसिकता जोवर बदलणार नाही तोवर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. भारताच्या संघर्षांत इंडियन लोकांच्या संवेदना संपत चालल्या आहेत.
हे शेती प्रश्नामागचे मूळ कारण आहे. आजही शेती सर्वाधिक रोजगारक्षम व्यवसाय समजला जातो. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, अशी भूमिका यावेळी गिरीश गांधी यांनी मांडली. विजय चोरमाळे आणि किरण साष्ठे यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 1:04 am