उजनी धरणातून सीना नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्याने हे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यात पोहोचण्यास विलंब लागत आहे. मागणीनुसार जादा वेगाने पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यावर शासनाने धरणातून पुरेशा वेगाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी गुरूवारी सायंकाळी आपले उपोषण मागे घेतले.
सायंकाळी आमदार माने यांच्याशी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अभय दाभाडे यांनी चर्चा केली. त्यानंतर लगेचच जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे व सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली. यात उजनी धरणातून सोडण्यात आलेले ९५० क्युसेक्स विसर्गाने सोडताना पाणी मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथील कालव्यातून शंभर क्युसेक विसर्गाने सीना नदीत पाणी सोडण्यावर शिक्कमोर्तब झाले. हे पाणी सोडताना मूळ निर्णयात कोणताही फरक केला जाणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घेतल्याचे आमदार माने यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्य़ात यंदा निम्मा पावसाळा संपत आला तरी पुरेसा पाऊस पडला नाही. सुदैवाने पुणे जिल्ह्य़ात पडलेल्या पावसामुळे उजनी धरणात महिनाभर तब्बल ८२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून भीमा व सीना नदीत अकरा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. परंतु पाण्याचा वेग कमी असल्यामुळे सुरूवातीच्या भागालाच पाणी मिळते. यात मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. याच प्रश्नावर तीन दिवसांपूर्वी मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी सोलापुरात उजनी लाभक्षेत्र प्राधिकरण कार्यालयात, सिंचन भवनात घुसून कार्यालयात तोडफोड केली होती.
दरम्यान, उजनी धरणातून सीना जोड कालव्यात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग वाढून तो ९५० क्युसेक करण्यात आला तरी सोडलेले पाणी दक्षिण सोलापुरात पोहोचण्यास विलंब होत असल्याची आमदार दिलीप माने यांची तक्रार आहे. याच प्रश्नावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. त्यांच्यासमवेत अन्य कार्यकर्त्यांनीही उपोषणात सहभाग घेतला, अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले.