कोयना जलाशयात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणाऱ्या नौका विहारासंदर्भात येत्या महिनाभरात मंत्रालयात पोलीस, महसूल व कोयना प्रकल्प प्रशासन यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोयना धरणात बोटिंग सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दौलतनगर (ता. पाटण) येथे स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मंत्री केसरकर आले असता दौलतनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी केसरकर यांनी महसूल, पोलीस, कोयना प्रकल्प प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन कोयना धरणात लवकरात लवकर बोटिंग चालू करण्यात येणार असून, या तिन्ही विभागाने आपला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. बैठकीला पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह स्थानिक प्रशासनाची उपस्थिती होती.

आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे सात किलोमीटर अंतरावरून कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर अंतरावर बोटींग सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की यापूर्वी कोयना धरणाच्या भिंतीपासून दहा अथवा सात किलोमीटर पुढे बोटिंग चालू करावे, असा अहवाल पोलीस प्रशासनाने दिला होता. आमदार देसाई यांनी धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर परिसरात बोटिंग सुरू करावे, अशी मागणी केली होती. आमदार देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर अंतरावर बोटिंग सुरू करण्याला ग्रीन सिग्नल देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बोटिंगसाठी मानाईनगर गावाजवळचे ठिकाण निश्चित केल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.