राज्यात अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या व रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन घोषित करण्यात येत आहे. नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद पाठोपाठ आता रायगड जिल्ह्यात देखील दहा दिवस लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाउन असणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आज घोषणा केली.
आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेत, हा निर्णय घोषित केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, किराणा माल आणि भाजी विक्री बंद राहणार आहे.
सध्या रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या सात हजारांच्याही पुढे गेली आहे. जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. पनवेल, उरण, पाठोपाठ, अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर आणि रोहा तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 5:19 pm