पालघरमध्ये अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंदचा निर्णय

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता एका रांगेत वेगवेगळी पाच दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, दंड ठोठावूनही नियम धाब्यावर बसवले गेल्याने अखेर प्रशासनाला अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नगरपरिषदेने दिले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार काही दुकाने सुरू ठेवण्यासाठीच्या नियमानुसार पालघर नगरपरिषदेमार्फत व्यापारी व दुकाने असोसिएशनला त्याबाबत नियोजन करण्यासाठी पत्राद्वारे म्हटले होते. मात्र हे नियोजन करणे अशक्य असल्याचे व्यापारी व दुकानदार यांच्या संस्थेमार्फत नगरपरिषदेला कळविण्यात आले. तसेच नगरपरिषद क्षेत्रात अनेक ठिकाणी अवास्तव व अनियमित दुकाने उघडी राहून त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नाहीत.  नागरिक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले होते. नगरपरिषदेने अशा दुकानदारांकडून हजारोंचा दंड वसूल केल्यानंतरही दुकानदार दाद देत नसल्याने नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार पालघर शहरातील माहीम रस्ता, कचेरी रस्ता, टेम्भोडे रस्ता, देवीसहाय रस्ता, मनोर रस्ता, मनोर माहीम हायवे रस्ता असे मुख्य रस्त्यावरील अत्यावश्यक व जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे सांगितले आहे. या रस्त्यावरील फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी विक्रेते यांनाही बंदी घालण्यात आली आहे. येणाऱ्या टाळेबंदीसंदर्भातील पुढील मार्गदर्शक सूचना येईपर्यंत हे नियम पालघर नगरपरिषद क्षेत्रात लागू राहणार आहेत,अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी लोकसत्ताला दिली.

सूचना आल्यानंतरच निर्णय

चौथ्या टाळेबंदीमध्ये सरकारने काही दुकानांना मुभा दिली असल्याचे म्हटल्यानंतर व्यापारी व दुकाने संस्थेमार्फत नगरपरिषदेत यावर सोमवारी चर्चा झाली. मात्र पुढील शासकीय सूचना व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे नगरपरिषदेचे म्हणणे आहे.

पाच वेगवेगळी दुकाने उघडी ठेवण्याची मुभा दिल्यानंतरही शहरात काहीजण आदेश पाळत नव्हते व बहुतांश दुकाने उघडी ठेवण्यात येत होती. या दुकानांवर सामाजिक संपर्क राखला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा अनेक दुकानांकडून हजारोंचा दंड वसूल केला, तरीही नियम पाळले जात नसल्याने पुढील आदेश व मार्गदर्शक सूचना येईपर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अरविंद माळी, मुख्याधिकारी.