राज्यामध्ये तौते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधुन करण्यास मान्यता देण्यात आली.

घरे पुर्णत: क्षतीग्रस्त झाले असल्यास –
नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पुर्णत: क्षतीग्रस्त झाले असल्यास किंवा अंशत: पडझड झालेल्या (किमान 15% नुकसान) कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/कौले/छत उडुन गेल्याने घरातील कपडे व घरगुती भाडयांचे/वस्तुंचे नुकसान झाले आहे अशा प्रकरणी कपडे तसेच घरगुती भांडी / वस्तुंकरिता अर्थ सहाय्य प्रति कुटुंब रू. 5000 कपडयांच्या नुकसानीसाठी आणि प्रति कुटुंब रू.5000 घरगुती भांडी/वस्तु नुकसानीसाठी. पूर्णत: नष्ट झालेल्या झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत रू.1,50,000 प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 15 टक्के) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत रू.15,000 प्रति घर तसेच अंशत: पडझड झालेल्या (किमान 25 टक्के) पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत रू.25,000 प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान 50 टक्के) पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत रू.50,000 प्रति घर. नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांना मदत रू. 15,000 प्रति झोपडी अशी मदत देण्यात येईल.

पिकांच्या नुकसानीसाठी मदत –
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बहुवार्षिक पिके- रू 50,000 प्रति हेक्टर. नारळ झाडासाठी- रू 250 प्रति झाड, सुपारी झाडासाठी- रू 50 प्रति झाड, 2 हेक्टरच्या मर्यादेत.

दुकानदार व टपरीधारक –
दुकानदार व टपरीधारक जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.10,000 पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.

मत्सव्यवसायिकांचे नुकसान-
बोटींची अंशत: दुरूस्ती रू 10,000 पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी रू.25,000,अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी रू 5000, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी रू. 5000.

आपत्ती प्रसंगी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली अनुदान/मदत घेतली असल्यास वरील मदत अनुज्ञेय असणार नाही.

पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना यांनी योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल. नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.5000 इतकी मदत देण्यात येईल. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना दिनांक 26.08.2020 च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. तौते चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 4 लक्ष रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त 1 लक्ष रुपये इतकी मदत देण्यात येईल.